भीषण अपघात; भरधाव स्विफ्ट कार पळसाच्या झाडावर आदळली; चिखली- साकेगाव रोडवरील घटना; २ जण जागीच ठार; तिघे गंभीर

प्राप्त माहितीनुसार सुनील किसनराव देव्हडे (३३) हर्षद पांडे(३०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले( दोघे रा.चिखली) आणि पप्पू राजपूत( रा.साकेगाव, ता.चिखली) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातातील मृतक आणि जखमी एकमेकांचे जिवलग मित्र होते. साकेगावच्या पप्पू राजपूत ला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण साकेगावला पप्पू राजपूत याला सोडायला जात होते. वाघापूर जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली, अपघाताने पळसाचे झाडही जमिनीतून मुळासकट उखडले. या भीषण अपघातात सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे.