मोताळ्यात भीषण अपघात : ४०७ वाहनाने ऑटोला उडवले; तरुणी ठार, दोघे गंभीर

 
अपघात
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ४०७ वाहनाने ऑटोरिक्षाला दिलेल्या धडकेत २३ वर्षीय तरुणी ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही भीषण दुर्घटना आज, १ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मलकापूर- मोताळा मार्गावरील घुसर फाट्याजवळ झाला.

प्रियांका दिनेश चोपडे (रा. हरिकिरण सोसायटी, मलकापूर) असे अपघात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे तर प्रियांकाचा भाऊ विनय चोपडे (२०) आणि नातेवाइक यश पांडव (२०) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील खासगी हॉस्पिटल मध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रियांकाचे एमएस्सीपर्यंत शिक्षण झाले असून, शैक्षणिक कामासाठी तिला मेहकरला जायचे होते.

मात्र एसटी बस बंद असल्याने आत्येभावाच्या ऑटोने ती, तिचा भाऊ आणि आत्येभाऊ मेहकरला जात होते. घुसर फाट्याजवळ बुलडाण्याकडून येणाऱ्या ४०७ वाहनाने ऑटोला उडवले. अपघातातील जखमींना तातडीने बुलडाणा येथे हलविण्यात आले. मात्र बुलडाणा येथे नेत असताना वाटेतच प्रियांकाचा मृत्यू झाला. तिच्या दोन्ही भावांवर सध्या उपचार सुरू आहेत. एसटी बस सुरू असत्या तर कदाचित तिला ऑटोने जावे लागले नसते. तिचा जीव वाचला असता, असे तिच्या नातेवाइकांमध्ये बोलले जात आहे.