शेतकऱ्यांची ३६ लाख ५७ हजारांनी फसवणूक ! शेतकऱ्यांना वाटल व्यापारी आज येईल,उद्या येईल; पण तो काही आलाच नाही! काय आहे प्रकरण? वाचा...

 
police  station andhera
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परिसरातील शेतकऱ्याकडून सोयाबीन विकत घेतली आणि कोणालाही काहीही न सांगता व्यापारी फरार झाला तो वर्षभरापासून घरी परतलाच नाही. आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर अंढेरा पोलीस  ठाण्यात तक्रार दिली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल कला आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील अशोक आनंथा शिंदे वय २५ वर्षे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की, सन २०१८-१९ पासून आसोला बुद्रुक येथील वहिदखान दिलावर खान हा व्यापारी २०१८ - २०१९ पासून मेरा खुर्द फाट्यावर एक भाड्याचा गाला घेवून त्यामध्ये सोयाबीन माल खरेदीचा व्यवसाय करत होता. गावाशेजारी असलेल्या असोला येथील तो रहिवासी असल्याने गावातील तसेच परिसरातील इतर गावांमधील शेतकरी त्याला आपली सोयाबीन विकत होते. सुरुवातीला घेतलेल्या मालाचे पैसे देऊन त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेवून व्यापारी वाहेद खान दिलावर खान यांने शेतकऱ्या कडून उधारीवर माल घेतला.

२८६.२७ क्विंटल सोयाबीन, १४५.१९ क्विंटल हरभरा आणि ०७.०८ क्विंटल तूर असा एकूण ३६ लाख ५७ हजार ६३० रूपयाचा माल खरेदी करून त्याचा मोबदला देतो असे म्हणून आरोपी वाहेद खान यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्या घरी वारंवार चकरा मारल्या तरी तो सापडला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या अंत्री खेडेकर येथील अशोक आनंथा शिंदे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारी वरून ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार मुंडे यांनी आरोपी वहिद खान दिलावर खान रा असोला बुद्रुक यांच्या विरूध्द कलम ४३०, ४०६, भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बिट अमलदार कैलास उगले व देढे यांच्या कडे सदर तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी वर्षभरापासून फरार आहे. सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागेल का? शेतकऱ्यांना पैसे मिळतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.