खामगांवात ट्रॅक्टर मोर्चातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, शेतकरी संतापले म्हणाले, न्याय मागणे गुन्हा आहे काय?

 
Jfjcn
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) १ जानेवारीला खामगावात बोरी आडगाव येथील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघाला. या मोर्चातील शेतकरी आंदोलकांवर काल, २ जानेवारीला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे न्याय मागणे गुन्हा आहे का असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
खामगांव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेतकऱ्यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून उपोषण पुकारले होते. शासन उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी ट्रॅक्टर मोर्चा काढला. हा मोर्चा बोरी आडगाव येथून खामगावात दाखल झाला होता.
दरम्यान पोलिसांनी ब्रॅकेट्स लावून अडवला असता पोलीस व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. या प्रकरणी काल २ जानेवारीला खामगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मोर्चातील प्रमुख शेतकऱ्यांसह आंदोलक महिला आणि पुरुषांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोहेकॉ गोपाळ सातव यांनी खामगाव शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब पाटील,संदीप पाटील, बाळू पाटील, बाळू खरात,मारुती तायडे, आनंद सुखाडे, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर टिकार हिम्मत सुरवाडे, श्याम अवथले यांच्यासह आदींवर भादवि कलम ३४१,२९४,१८६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरी आडगाव येथे २७ डिसेंबर पासून उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान सोमवारी ट्रॅक्टर मोर्चाला खामगाव पोलिसांनी रस्त्यात रोखले. त्यावेळी आंदोलन शेतकरी व पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र काही वेळानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले होते.