लोणार तालुक्यातील भुमराळ्यात शेतकऱ्याचा खून! गळा दाबला! भांडण सोडवायला मध्ये जाणे पडले महागात..

 
suside
बिबी(ऋषी दंदाले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भांडण सोडवायला मध्ये जाणे शेतकऱ्याच्या चांगलेच अंगलट आले. मारेकऱ्यांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली, गळा दाबला, त्यामुळे शेतकऱ्याच्या नाकातोंडातून रक्त पडले. उपचाराला नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. लोणार तालुक्यातील भुमराळा दरी शिवारात काल २३ मार्चच्या दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. भानुदास रोहिदास चव्हाण (५०,रा. भुमराळा दरी, ता.लोणार) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बिबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृतक शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.
 

मृतक शेतकऱ्याच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार  काल, दुपारी २ च्या सुमारास त्यांच्या चुलत दिर गणेश चिंतामण चव्हाण(२३) याला मोबाईल वर मॅसेज पाठवल्याच्या कारणावरून नितीन अशोक कहाळे, सीमा अशोक कहाळे( दोघे रा.रुम्हणा,ता. सिंदखेडराजा) व दिलीप काळे, मंगल दिलीप काळे, भारत दिलीप काळे ( तिघे रा.शेवली,ता. मंठा, जि.जालना) हे मारहाण करीत होते.त्यावेळी चुलत भावाला वाचवण्यासाठी भानुदास चव्हाण भांडण सोडवायला मध्ये गेले,पोरांना मारू नका असे ते म्हणत होते. मात्र मारेकऱ्यांनी यावेळी भानुदास चव्हाण यांनाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने ते खाली कोसळले. भारत काळे याने भानुदास चव्हाण यांचा गळा दाबला त्यामुळे त्यांच्या नाका तोंडातून रक्त आले, तोंडातून जेवणाच्या उलट्या झाल्या. त्यामुळे भानुदास चव्हाण यांना तातडीने बिबी येथील रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.