इसरुळच्या माजी सरपंचांनी उडवली महसूल प्रशासनाची झोप !

अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवाल्यांना चहापान करतानाचा व्हिडीओ व्हायरल! महसूल प्रशासनाचा केला शाब्दिक उद्धार!

 

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा नदीतून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक केली जात आहे. मधील मार्गांवर लागणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांची पर्वा न करता टिप्परचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. यापूर्वी या चालकांनी अनेकांचा बळी घेतला आहे. अशा दुर्घटना घडूनही महसूल प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या इसरुळचे माजी सरपंच पतीने संतोष भुतेकर यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओमुळे महसूल विभागाची झोप उडाली आहे.

psc
चिखली तालुक्यातील इसरुळचे माजी सरपंचपती तथा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भुतेकर यांनी चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी इसरुळ मार्गाने रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परचालकांना थांबवून त्यांचा उपहासात्मक आदरतिथ्य केला. त्यांना चहापान केला. सर्वसामान्यांच्या जीवाची पर्वा न करता महसूलवाल्यांच्या भीतीपोटी तुम्ही जोरात वाहने दामटता, तुम्ही अजिबात घाबरू नका, चिंता करू नका. चालक, मालक व लोकेशन देणाऱ्यांना येथे रोज चहा मिळेल. अधिकारी तो, जो अधिकाराची चोख अंमलबजावणी करतो. मात्र, अकार्यक्षम अधिकाऱ्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही. रस्त्यात खड़े की खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. कुणाचा जीव गेला तरी त्यांना काहीच सोयरसुतक नसते. त्यासाठी टिप्परचालकांनो येथून पुढे शांततेने वाहने चालवा, असा सल्ला देणाऱ्या संभाषणाचा संतोष भुतेकर यांचा हा व्हिडीओ सर्वत्र जोरात व्हायरल होत आहे. या माध्यमातून संतोष भुतेकर यांनी महसूल प्रशासनाचा शाब्दिक उद्धार केल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओत त्यांनी महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले असून, रेतीमाफियांना मार्मिक फटके दिले आहेत. निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांचे भाव वाढतात. त्यामुळे निवेदन द्यायचे नाही, असेही ते संतापून बोलताना दिसत आहेत. महसूल प्रशासन जागे होत नसल्याने देऊळगाव राजा व चिखलीच्या तहसीलदारांना बांगड्या भरू, असा इशाराही त्यांनी संभाषणाअखेर दिला आहे.

व्हिडीओमुळेच कारवाई सुरू

समाजसेवकाच्या या व्हिडीओमुळेच वठणीवर आलेले महसूल प्रशासन कारवाईसाठी पुढे धजावले. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनादेखील जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.