खळबळजनक! पिंपळगाव सराईच्या जंगलात आढळला तरुणीचा मृतदेह; जागेवरच करावे लागले पोस्टमार्टम, कारण...! घातपाताचा संशय

 
ps
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईच्या जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या भागात तरुणीचा मृतदेह सापडला ती जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. तरुणीचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे वयाचे आहे.
 

प्राप्त माहितीनुसार मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने साधारण ७ ते ८ दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असावी.  या मुलीचा घातपात करण्यात आला असावा असे प्रथमदर्शनी दिसत आहे. परिसरातील नागरिकांना हा मृतदेह दिसल्यावर ही बाब पोलीस पाटलांना कळविण्यात आली. पोलिस पाटील रामेश्वर गवते यांनी रायपूर पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच शिवछेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुणीच्या अंगात हिरवट रंगाचा टॉप, लाल रंगाचा सलवार, दोन्ही पायात सॅंडल, हातात एकेक बांगडी, रंग निमगोरा आणि केस काळे असे तरुणीचे वर्णन आहे. अशा वर्णनाच्या तरूणीबाबत कुणाला काही माहीत असल्यास रायपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजरत्न आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस करीत आहेत.