खळबळजनक! सूरज, यशिका, रोहीत, यश, राजेंद्र एकत्र आले अन्‌ खामगावच्या तरुणाला ११ लाखांनी गंडा घालून गेले!!

 
खामगाव शहर पोलीस ठाणे
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट देण्याचे आमिष दाखवून खामगावच्या २३ वर्षीय तरुणाला खोट्या कंपनीच्या खोट्या लोकांनी (सूरज, यशिका, रोहीत, यश, राजेंद्र) एकत्र येत तब्बल ११ लाख रुपयांनी गंडा घातला. काल, ७ जानेवारीला या तरुणाने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

झुबेर रिजवान भुरानी (२३, रा. जिया कलणी, खामगाव) याने या प्रकरणात तक्रार दिली. त्‍याचे महावीर चौकात फाईन कलेक्शन आहे. इन्स्टाग्राम खाते चाळत असताना त्‍याला २८ ऑगस्टला इलेक्‍ट्रो ई. व्ही. पॉईंट २६/१ ब्रिगेड गेटवे डॉ. राजकुमार रोड, २२ वा माळा मल्लेश्वरम बंगळुरू, कर्नाटका या कंपनीच्या एक पेजवर जाहिरात दिसली.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग पईंट देण्याची ही जाहिरात होती. जाहिरातीच्या अनुषंगाने झुबेरने मेसेज केला असता यशिका नावाच्या मुलीचा व्हॉट्‌स अॅपवर मेसेज आला. त्‍या मेसेजच्या अनुषंगाने झुबेरने खामगाव येथे ईलेक्ट्रो ई. व्ही. पॉईंट घेण्याची तयारी दाखविली. त्‍याला मोबाइलवर सर्व माहिती देऊन कंपनी सरकारशी निगडीत असल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जींग पॉईंट देण्यास तयार आहोत, असे सांगितले. सुरुवातीला १३ हजार ५०० रुपये एंट्री फी भरायला सांगितली. त्‍यानंतर त्‍याला कन्फर्मेशन लेटर आले.

लेटरमुळे झुबेरचा कंपनीवर विश्वास बसला. कंपनीच्या मार्फत सूरज, यशिका, रोहीत, यश, राजेंद्र सर्व (रा. दिल्ली) यांचे बऱ्याचदा फोन येऊ लागले व त्यांनी फोनद्वारे पैशांची मागणी केली. त्यांनी इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईंट देण्याचे आमिष दाखवल्याने झुबेरनेही १० सप्‍टेंबर २०२१ रोजी २० हजार, ११ सप्‍टेंबरला १ लाख, त्‍याच दिवशी पुन्हा २५ हजार, १३ सप्टेंबरला १ लाख ३० हजार, १५ सप्‍टेंबरला १ लाख ३२ हजार, याच दिवशी पुन्हा १ लाख ३२ हजार, १० सप्‍टेंबरला सूरज नावाच्या कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये, त्याच दिवशी आणखी ३५ हजार व ५ हजार, ६ सप्‍टेंबरला ९१ हजार ५०० रुपये, २३ सप्‍टेंबरला ९१ हजार ५००, ८ सप्‍टेंबरला ७४ हजार ५००, याच दिवशी आणखी ९५ हजार ५०० रुपये पाठवले.

अशा प्रकारे सदर कंपनीशी निगडीत लोकांना विविध दिवशी रकमा पाठविल्याचे झुबेरने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍याला रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे बनावट डिपझिट सर्टिफिकेटही पाठविण्यात आले. एकूण ११ लाख रुपये भामट्यांनी त्‍याच्‍याकडून हडपले. फसवले गेल्याची जाणीव झाल्यानंतर झुबेरने खामगाव शहर पोलीस ठाणे गाठले. तपास सुरू आहे.