खळबळजनक! श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनीच शेगावात मोठी कारवाई; देशी पिस्टल, ४ जिवंत काडतुसांसह तिघांना बेड्या; बुलडाणा एलसीबी पथकाची कारवाई; काय होता आरोपींचा प्लॅन?

 
yuy
शेगाव ज्ञानेश्वर ताकोते (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संतनगरी शेगाव येथे आज, १३ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा होत असतांनाच खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. बुलडाणा एलसीबी पथकाने तीन जणांना एक देशी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह अटक केली. आरोपी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील तिघांपैकी एक जण अल्पवयीन आहे.

sagvan

         (जाहिरात👆)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव वरवट रोडवरील  बुरुंगुले शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. पातुर्डा येथील शेख अकबर शेख हारून (२१), जिवन तेजराव गाडे (१८) आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे तिघे रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल ने शेगावकडे येते होते.  एलसीबी पथकाला याबाबतची माहिती मिळाली. शेगावकडे येणाऱ्या तिंघाजवळ देशी पिस्टल आणि जिवंत काडतुसे असल्याचे गोपनीय सूत्रांनी एलसीबी पथकाला सांगितले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शेगाव वरवट रोडवरील  बुरुंगुले शाळेजवळ एलसीबी पथकाने सापळा रचून तिघाही आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असत देशी पिस्टल शेगावात विकण्याचा त्यांचा प्लॅन होता असे समोर आले. तिघाही आरोपींच्या विरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसपी सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात( खामगाव), बबन महामुनी ( बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ  सुधाकर काळे, नापोकॉ संजय नागवे,नापोकॉ अनंता फरतळे व चालक मधुकर रगड यांनी केली.