"उत्पादन शुल्क'ही सक्रीय... अवैध दारू धंद्यांविरूद्ध कारवाईचा धडाका!!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा फास आवळलेला असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात कारवाईचा मोठा धडाका या विभागाने लावला आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काल, २२ नोव्हेंबरला धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत मोताळा तालुक्‍यातील सिंदखेड लपाली, बोराखेडी, सारोळा, शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा, चिखली तालुक्‍यातील शेलगाव आटोळ या ठिकाणी अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले तर ७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कारवाईत एका वाहनासह ११ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहिमेत शेगावचे दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे, चिखलीचे निरीक्षक जी. आर. गावंडे यांच्या पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी खामगाव ते जलंब रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पहुरजिरा (ता. शेगाव) येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीचा आयशर ट्रक (क्र. एमएच ११ सीएच ४८८२) पकडला.

यावेळी अशोक भिकाजी कोंडे (रा. पहुरजिरा) याच्याकडून महाराष्ट्र राज्यातून प्रतिबंधित असलेल्या गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेश मद्य साठ्याचा गोल्डन ॲस ब्ल्यु व्हिस्की या ब्रॅण्डच्या साडेसातशे मि.ली. क्षमतेच्या एकूण १० विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. बॉटल व वाहन जप्त करून कोंडे याच्‍याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत खामगावचे दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे, जवान अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, संजीव जाधव व सौ. शारदा घोगरे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे करीत आहे.

आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्‌स ॲप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगताना, मद्य सेवन, मद्य वाहतूक करतानासुद्धा उत्‍पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.