फॉरेन्सिक टीमने २४ तास सलग काम केले तरी मृतांची ओळख पटायला लागतील ४ ते ५ दिवस! मात्र जळालेले मृतदेह एवढे दिवस ठेवता येणार नाही; मंत्री गिरीश महाजनांची मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा;

२५ जणांवर उद्या बुलडाण्यातच  सामूहिक अंत्यसंस्कार होण्याची शक्यता..!

 
crime

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाच काय तर संपूर्ण राज्याचे काळीज हेलावणारी घटना मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर पिंपळखुटा गावाजवळ झाली. खासगी बस खांबाला धडकल्यानंतर उलटली, त्यानंतर बसने पेट घेतला आणि त्यात २५ जणांचा जळून कोळसा झाला. सगळ्यांचे मृतदेह बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. मृतकांची नावे समोर आली असली तरी मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने कोणता मृतदेह कुणाचा ही ओळख पटवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सगळ्या मृतदेहांवर नातेवाईकांच्या उपस्थितीत उद्या २ जुलैला बुलडाण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची श्यक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन सकाळपासून बुलडाण्यात ठाण मांडून असून मृतकांच्या नातेवाईकांशी ते चर्चा करीत आहेत.

वृत्त लिहिस्तोवर २५ पैकी १९ जणांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले असून रात्री उशिरापर्यंत मृतकांचे नातेवाईक पोहचण्याची शक्यता आहे. सगळ्यांचे नातेवाईक आल्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यावर निर्णय होईल. सध्या पोहचलेल्या १९ जणांनी सामूहिक अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

   २४ तास सलग काम केले तरी...

दरम्यान फॉरेन्सिक टीमने राज्यातल्या सगळ्या मशीन एकत्र करून २४  तास काम केले तरी मृतदेह कुणाचा याची ओळख पटायला ४ ते ५ दिवस लागतील. मृतदेह आधीच प्रचंड जळल्यामुळे शवगृहात त्यांना ३ दिवसापेक्षा अधिक वेळ ठेवता येणार नाही अशी स्थिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी ही वस्तुस्थिती मृतकांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता सामूहिक अंत्यसंस्कार करण्याच्या बाबतीत निर्णय होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे. सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय झालाच तर उद्या २ जुलैला अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.