मलकापुरच्या म्हाडा कॉलनीत भीषण चकमक!अट्टल गुंडाचा पोलिसांवर तलवारीने वार, पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी झाडल्या तीन गोळ्या, तीन पोलीस किरकोळ जखमी! दाम्पत्य गंभीर...
Sep 2, 2024, 09:46 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर येथील म्हाडा कॉलनीत शनिवारी संध्याकाळी चांगलाच राडा झाला. गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडाने तलवारीने हल्ला चढवला. पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला..एवढे करूनही पोलीस गुंडाला पकडण्यात अपयशी ठरले..यावेळी झालेल्या झटापटीतून गुंड फरार झाला..आता "त्या" गुंडा विरोधात मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांचे एक पथक पुन्हा त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत ३ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून पोलीस यायच्या आधीच गुंडाने एका दाम्पत्याला गंभीर जखमी केले होते. त्या दाम्पत्यावर उपचार सुरू आहेत.
मलकापूर शहरासह तालुक्यात खळबळ उडवून देणारी ही घटना मुक्ताई नगर मार्ग लगतच्या म्हाडा वसाहत मध्ये शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी मध्य रात्री उशिरा ही थरारक चकमक उडाली.
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक म्हाडा कॉलनीतील रहिवासी मनोजसिंह सिकंदरसिंह टाक हा तडीपार व कुख्यात गुन्हेगार आहे. तो शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात दाखल झाला . म्हाडा वसाहत मध्ये राहणाऱ्या टाक याने रात्री उशिरा घरात डुक्कर येतात या क्षुल्लक कारणावरून त्याच परिसरातील बामंदे कुटुंबीयांसोबत वाद घातला. या वादाचे पर्यवसन भीषण हाणामारीत झाले. आरोपी टाक याने बामंदे परिवारातील पती-पत्नी वर हल्ला चढविला. लोखंडी राॅड तथा तलवारीचा वापर करीत त्यांना गंभीररीत्या जखमी केले.
आधी दगडफेक आणि...
दरम्यान या घटनेची माहिती मलकापूर शहर पोलीस ठाण्याला काही नागरिकांनी दिली. घटनेचे गांभीर्य आणि टाक याचे कारनामे माहीत असल्याने मलकापूर शहर पोलिसांचे 'डीबी' पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आधी गंभीर जखमी बामंदे पती-पत्नीला उपचारार्थ उप जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना केले.त्यानंतर टाक याच शोध घेणे सुरू केले. या धामधुमीत मनोजसिंह टाक ची पत्नी विटेच्या सहाय्याने स्वतःचे डोके फोडण्याचा प्रयत्न करीत होती, अशी माहिती आहे. हा प्रकार झाडाझुडपात लपलेल्या मनोजसिंह टाक च्या लक्षात येताच त्याने प्रारंभी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता त्याने सरळ तलवार हातात घेऊन पोलिसांच्या दिशेने चाल करीत पोलिसावर तलवारीने हल्ला केला. सुदैवाने दक्ष असलेल्या पोलिसांनी त्याचा हा प्राणघातक हल्ला चुकविला. आरोपी बेफाम असल्याने तो पुन्हा हल्ला करण्याच्या बेतात होता.
अन् ढिषक्यांव ढिषक्यांव....
त्यामुळे त्याच्या हल्ल्यापासून बचावासाठी ( स्वरक्षणासाठी) एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जवळील अग्नी शस्त्राने आरोपीला धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. हवेत दोनदा गोळीबार केला. मात्र तो आरोपी नियंत्रणात येत नसल्याने अखेर नाईलाजास्तव त्या कर्मचाऱ्याने आरोपीच्या दिशेने कमरेखालील भागात पायाकडे गोळी झाडली. जवळपास तीन गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांच्या प्रतिकाराने टाक याचे अवसान गळाले. यामुळे घाबरून गेलेल्या टाक याने रात्रीच्या अंधाराचा, झाडाझुडपांचा फायदा घेत आणि स्वतःची पत्नी व मावशीच्या सहकार्याने घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी आरोपी मनोजसिंह टाक ची पत्नी, त्याची मावशी, मावशी चा मुलगा व भावाचा मुलगा सुद्धा घटनास्थळी हजर होते.
या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वरगे, पोलीस उप निरीक्षक सुनील भुसळे, पोलीस कर्मचारी नासिर व मतीन किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून तात्काळ पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना घटनेची माहिती देण्यात आली. यामुळे एसडीपीओ देवराम गवळी पथकासह म्हाडा वसाहत परिसरात दाखल झाले.
दरम्यान काल, रविवारी, १ सप्टेंबर रोजी घटनास्थळी आणि मलकापूर पोलीस ठाण्यात नूतन बुलडाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे तसेच खामगाव व अन्य ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी (मलकापूर ) गवळी, मलकापूर शहरचे ठाणेदार आणि डीबी पथकातील कर्मचारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.तसेच तपासाच्या दृष्टीने सूचना, निर्देश दिले.