बुलडाणा शहरातील खून प्रकरणात ८ ते ९ संशयितांची चौकशी सुरू! कुणालाही अटक नाही! कुणीही गुन्ह्याची कबुली दिली नाही! ठाणेदारांचे स्पष्टीकरण...

 
बुलडाणा

बुलडाणा( अभिषेक वरपे :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भीमजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान बुलडाणा शहरातील आशुतोष पडघान या तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली होती. दरम्यान आज बुलडाणा शहर पोलिसांनी ८ ते ९ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप चौकशी सुरू असून संशयीतांपैकी कुणीही खुनाची कबुली दिलेली नाही, त्यामुळे कुणालाही अटक करण्यात आली नाही असे स्पष्टीकरण ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिले आहे.

 काल, रात्री साडेदहाच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसरातील गुरुनानक ड्रेसेस समोरील एका बोळीत अज्ञातांनी आशुतोष चा धारधार शस्त्राने खून केला. आशुतोषच्या आतेभावाने दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणी तपासला गती दिली आहे. आशुतोष गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, तो चोऱ्या करायचा, गांजा पिणाऱ्या मुलांसोबत रहायचा असे त्याच्या आतेभावाने तक्रारीत म्हटले आहे. सध्या याप्रकरणात ८ ते ९ संशयीतांना बुलडाणा शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याच्यांपैकीच आरोप असण्याची दाट शक्यता असली तरी तेच आरोपी असे म्हणणे घाईचे होईल असे नरेंद्र ठाकरे म्हणाले.त्यामुळे सध्या चौकशी सुरु आहे, कदाचित आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कुणीही खुनाची कबुली दिलेली नसल्याने कुणालाही अटक करण्यात आलेली नाही असे ठाणेदार नरेंद्र ठाकरे म्हणाले.