उभ्या ट्रकवर आयशर धडकले; चालकासह दोघे ठार! खामगाव- नांदुरा महामार्गावरील कोक्ता शिवारातील घटना!

 
खामगाव
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): टायर पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील आयशर धडकले. यात दोघे जागीच ठार झाले. खामगाव ते नांदुरा महामार्गावर कोक्ता शिवारात ९ मे रोजी दुपारी ३ वाजता ही दुर्घटना घडली.
लोखंडी पाइप घेऊन जात असलेल्या ट्रक (क्रमांक जीजे ३९-टी-९५९५) चे टायर पंक्चर झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक रुपाभाई माझाभाई रबरी (४२) यांनी कोक्ता शिवारात ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मागून भरधाव वेगात आलेले आयशर (क्रमांक एमएच-१८- बीझेड-७२२२) ट्रकवर जोरात धडकले. या भीषण अपघातात आयशरचा चालक बबलू रामलाल व जलिलोद्दीन खान फारुख खान (दोघे राहणार बालसमूद, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश) हे जागीच ठार झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, आयशरच्या केबिनचा चुराडा झाला. त्याचप्रमाणे ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता दवाखान्यात पाठविले. अपघातामुळे काही काळ या रोडवरील वाहतूक खोळंबली होती. मात्र पोलिसांनी वेळीच काही वेळात वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.