खा. प्रतापराव जाधवांच्या दोन समर्थकांवर गुन्हा दाखल! वाचा कारण काय?

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून खा.जाधव यांनी २ एप्रिलच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर शहरात जंगी रॅली काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महायुतीची भव्य सभा पार पडली. दरम्यान खासदार प्रतापराव जाधवांच्या दोन समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी केली. नागेश गोविंदराव सोनुने, तसेच विनोद गजानन चांदणे अशी दोघांची नावे आहेत. दोघांविरुद्ध ३ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे यांनी शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागेश गोविंदराव सोनुने, व विनोद गजानन चांदणे या दोघांनी प्रतापराव जाधवच येणार, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अश्या घोषणा दिल्या. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होय. असे तक्रारीत म्हटले आहे.