क्रिष्णाच्या हत्याकांडानंतर आ. डॉ.संजय कुटे उद्विग्न! म्हणाले घटना वेदनादायक; आरोपींना फाशी होण्यापर्यंत विशेष लक्ष देणार!
विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांनी खटला चालवावा यासाठी प्रयत्न करणार...
Jul 26, 2024, 19:48 IST
संग्रामपूर(स्वप्निल वानखेडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णा कऱ्हाळे या १४ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून खून करण्यात आल्याने समाजमन हळहळले आहे. खंडणी वसूल करण्यासाठी ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून आतापर्यंत २ आरोपी अटकेत आहेत. दरम्यान या घटनेवर आ. डॉ.संजय कुटे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अंत्यंत वेदनादायी आहे आहे, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ.कुटे म्हणाले.
Advt.👆
माझ्या संवेदना कऱ्हाळे कुटुंबासोबत आहेत. भावनाहिन झालेल्या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी माझा शासनाकडे प्रयत्न राहणार असल्याचे आ.कुटे म्हणाले. घटनेमागे असलेल्या पूर्ण रॅकेटचा पडदा उठवण्यासाठी या प्रकरणात शासन पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः विशेष लक्ष देणार असल्याचेही आ.कुटे म्हणाले. सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी ही प्रयत्न करणार असून आरोपींना फाशी होईपर्यंत विशेष लक्ष देणार असल्याचेही ते म्हणाले.