डॉ. खंडणी प्रकरण अपडेट! आरोपींना पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी; आरोपी विशाल गायकवाडने खंडणीच्या पैशातून घेतलेली स्पोर्ट बाईक पोलिसांनी केली जप्त; अजुन बरच काही बाकी....
Oct 27, 2023, 18:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ.सौरभ संचेती यांचा नग्न व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये उकळल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. बुलडाणा शहर पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांत अजय नागपुरे, दीक्षांत नवघरे, विशाल मनोहर गायकवाड, आदेश सुनील राठोड व सूरज पसरटे या ५ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे गेल्या ७ दिवसांत या प्रकरणात काय नव्याने समोर आले याबाबत उत्सुकता होती.
दरम्यान गेल्या ७ दिवसांत पोलिसांनी याप्रकणाचा बारकाईने तपास केला. आरोपींपैकी एक असलेल्या आरोपी विशाल गायकवाड याने डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्यानंतर यामहा कंपनीची नवी स्पोर्ट बाईक विकत घेतली, या बाईकची किंमत जवळपास अडीच लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.ही बाइक पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी तरुणांनी आपल्याला कोयत्यासारख्या शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केल्याचे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले होते,मात्र ते शस्त्र जप्त करण्यात आले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी आरोपींना काल, २६ ऑक्टोबरला पुन्हा न्यायालयासमोर दाखल केले. यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी पुन्हा आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करून आरोपींना पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याचाच अर्थ तपासात अजुन बरेच काही बाकी आहे...