जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण निलंबित! बिबी येथील विषबाधा प्रकरणी रुग्णांची हेळसांड अंगलट; "बुलडाणा लाइव्ह" ने दिले होते सर्वप्रथम वृत्त...

 
बिबी(जयजित आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील खापरखेड, सोमठाणा ग्रामस्थांना २० फेब्रुवारी रोजी भगरीतून विषबाधा झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. एका सप्ताहात केलेल्या प्रसादातून भाविकांना विषबाधा झाली होती. एकाएकी भाविकांना उलट्या मळमळ होऊ लागल्याने अनेक भाविकांना बिबी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. भाविकांची संख्या वाढल्याने रुग्णालयात पेशंट ठेवायला जागा नव्हती, शिवाय डॉक्टर देखील कर्तव्यावर नव्हते. त्यामुळे गावातील खाजगी डॉक्टरांनी येऊन उपचार केला. जागा नसल्याने रुग्णांना बाहेर दोरी लटकवून, झाडाला दोरी बांधून त्यावर सलाईन टांगून सलाईन देण्यात येत होते. त्यावेळी या प्रकाराचे वृत्त सर्वात आधी "बुलडाणा लाइव्ह" ने प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तब्बल ३०० जणांना यावेळी विषबाधा झाली होती. दरम्यान आता हे प्रकरण जिल्हा शक्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या चांगलेच अंगलट आले असून राज्य शासनाने त्यांचे निलंबन केले आहे. काल,४ जुलैच्या रात्री उशिरा त्यासंबंधीचे आदेश धडकले आहेत. सुभाष चव्हाण यांच्या जागी आता डॉ.भागवत भुसारी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रभार सांभाळतील.
बिबी येथील रुग्णांच्या हेळसांड प्रकरणाची गंभीर देखील उच्च न्यायालयाने घेतली होती. न्यायालयाने सरकारला या प्रकरणाचा जाब विचारला होता. आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या प्रकारामुळे राज्य शासनाकडून डॉ.चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले आहे.