नूतन वर्षासाठी जिल्हा प्रशासनाचाही संकल्प! राबविणार सुंदर माझे कार्यालय उपक्रम; जिल्हा कचेरीसह सर्व कार्यालये होणार चकाचक!!

 
file photo
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवीन वर्षासाठी बहुतेक जण उत्साहाने नवीन उपक्रम राबविण्याचा निर्धार करतात. मात्र प्रशासन किंवा प्रमुख अधिकारी एखादा संकल्प तोही वर्षभरासाठी करतील तर ती बाब विशेष अन्‌ कौतुकास्पद ठरणे स्वाभाविकच आहे. असाच एक कौतुकास्पद संकल्प चक्क जिल्हा प्रशासनाने अर्थात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केलाय! त्यांच्या पुढाकाराने सुंदर माझे कार्यालय हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार  आहे. यातही हा सुंदर संकल्प केवळ जिल्हाधिकारी कार्यालय वा महसूल कार्यालयापुरता मर्यादित नसून, जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांत २०२२ मध्ये वर्षभर राबविण्यात येणार आहे.

अर्थात या जिल्ह्याव्यापी संकल्पाच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाचा अर्धधिक भार सांभाळणारे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. गीते है तो  कुछ भी मुमकिन है.. अशी म्हण प्रशासकीय वर्तुळात का तयार झाली याचे एक उत्तर या उपक्रमात दडलंय! समृद्धी महामार्ग, कोरोनाविरुद्धची लढाई यामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिनेश गीते यांना जिल्हाधिकारी यांनी हा संकल्प बोलून दाखविताच त्यांनी त्याची ब्लु प्रिंट, नियोजन, अंमलबजावणीचे वेळापत्रक यावर परिश्रम घेतले. कल्पक जिल्हाधिकाऱ्यांनी काही बदल सूचवत वेळोवेळी निर्देश दिले. यासंदर्भात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकात काही उपयुक्त आयडिया मिळाल्या.

यामुळे हा संकल्प आणखीनच सुंदर झाला असून, याची अंमलबजावणी नवीन वर्षात लगेच करण्यात येत आहे. यासंदर्भात बुलडाणा लाइव्हशी बोलताना श्री. गीते यांनी संकल्प उलगडून दाखविला. अधिकारी व कर्मचारी यांचा दिवसातील एक तृतीयांश कालावधी हा कार्यालयात जातो. अनेकांच्या शासकीय सुट्यादेखील तिथेच खर्ची होतात. यामुळे कार्यालयाचे वातावरण, स्वच्छ, सुंदर, पोषक असल्यास कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढतो. कामाचा उरक वाढतो. कामाची गती, कार्यक्षमता वाढते व कर्मचारी दिवसभर फ्रेश राहतो. हा आपला अनुभव आहे. यामुळे या उपक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात कार्यालय परिसर व विभागनिहाय स्वच्छता १५ दिवसांआड करण्यात येणार आहे.

तसेच कुंड्या, पडदे, कचराडब्बे, दिशादर्शक फलक याशिवाय सार्वजनिक स्वच्छता, धूम्रपान मनाई, थुंकणे, विनामास्क प्रवेश प्रतिबंध याचे फलक लावण्यात येणार आहे. कर्मचारी बैठक व्यवस्था सुटसुटीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. लाईट, पंखे, विद्युत व्यवस्था यांची डागडुजी, महिलांसाठी हिरकणी व तारा कक्ष, सातत्याने शासकीय योजना फ्लॅश करण्यासाठी डिजिटल बोर्ड लावण्यात येणार असल्याचे श्री. गीते यांनी स्पष्ट केले.

पब्लिकसाठीबी...
दरम्यान या उपक्रमात कार्यालयात येणारे लाभार्थी व नागरिकांसाठी विविध सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. यात स्वच्छतागृह, वाॅटर एटीएम, वाढीव पार्किंग, बैठक व्यवस्था, सॅनिटायझर स्टॅण्ड, मास्क पेटी, चहा, कॉफीचे वेंडिंग मशीन कँटीन आदींचा समावेश आहे.

सुलभ कार्यपद्धती...
दुसरीकडे या उपक्रमामुळे दैनंदिन कार्यपध्दती देखील सुंदर करण्याचे नियोजन असल्याचे श्री. गीते यांनी सांगितले. सहा गठ्ठे पद्धती कार्यान्वित करणे, दर सोमवारी झिरो पेंडंसीचा आढावा, एसओ फाईल अद्ययावत करणे, विभागनिहाय शासन निर्णय, परिपत्रक, अधिसूचनांचे दरमहा वाचन, हालचाल हजेरी पत्रक अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांनाही लाभ
या उपक्रमाला व्यापक बनविण्यासाठी त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या अडचणी, दूर करण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गीते यांनी यावेळी दिली. ऑक्टोबरमध्ये संवर्गनिहाय व कालबद्ध पदोन्नतीची कार्यवाही, सेवापुस्तके पीडीएफ करून जतन करणे, गोपनीय अहवाल जतन करणे, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती जलद गतीने निकाली काढणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भविष्य निधी नोंदवही अद्ययावत करणे ही महत्त्वपूर्ण कामे करण्यात येतील. यामुळे त्यांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागण्यास हातभार लागणार असल्याचे श्री. गीते यांनी सांगितले.