पैशाचा पाऊस पाडून फसवणाऱ्या जानेफळच्या दिलीप इंगळेचा खूनच झाला! कर्जत तालुक्यात सापडलेला अनोळखी मृतदेह दिलीपचाच;
आरोपींची संख्या ५ वरून झाली १०; साथीदारांनीच केला गेम! पोलिसांनी जुन्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला, कारण...
वाचा डिटेल्स क्राईम स्टोरी...
Updated: Jul 12, 2024, 22:23 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील दिलीप इंगळे या तरुणाचे २२ जून रोजी अपहरण झाले होते. त्याच्या पत्नीने यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यावरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक अनोळखी मृतदेह सापडल्याबाबतची माहिती जानेफळ पोलिसांना मिळाली होती. अखेर "तो " अनोळखी मृतदेह दिलीप इंगळे याचाच असल्याचे १२ जुलै रोजी निष्पन्न झाले. दरम्यान याआधीच पोलिसांनी अपहरण प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींसह आणखी ५ जणांनी दिलीपचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींची संख्या आता १० झाली आहे, अद्याप ५ आरोपींना अटक करणे बाकी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. फरार असलेले आरोपी सातारा, फलटण या भागातील आहेत..ते दिलीप इंगळे याच्याच पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचाच भाग आहेत. या गुन्ह्यात वापरलेल्या ३ चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जून रोजी दिलीप इंगळे त्याच्या ५ साथीदारांसह कोपरगाव परिसरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेला होता. २४ जून रोजी कर्जत तालुक्यात एक अनोळखी मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेला असल्याने त्यावेळी तिथल्या स्थानिक पोलिसांना ओळख पटली नव्हती. त्यामुळे ४ -५ दिवस मृतदेह ओळख पटविण्यासाठी शितपेटीत ठेवण्यात आला होता. तिथल्या पोलिसांनी पंचनामा करून त्या मृतदेहाचे फोटो प्रसिद्धीस देऊन ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावेळी वेळेत ओळख न पटल्याने मृतदेह जास्त दिवस ठेवणे शक्य नसल्याने त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान इकडे २ -४ दिवस होऊनही नवरा न परतल्याने दिलीपच्या पत्नीने पोलिसांत धाव घेत अपहरणाची तक्रार दिली. दिलीप सोबत गेलेल्या अमोल राजपूत, संदीप सुभाष शेवाळे, योगेश रमेश तोंडे यांच्यासह पुणे व सातारा जिल्ह्यातील दोघांवर दिलीपच्या पत्नीने संशय व्यक्त केला होता. कारण अमोल राजपूत व इतर आरोपी आणि दिलीप इंगळे हे साथीदार होते. सर्व मिळून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत लोकांना फसवायचे. या मिळालेल्या पैशाच्या वाटपावरून दिलीप इंगळे याचे अमोल राजपूत याच्याशी वाद झाल्याचे दिलीप इंगळेच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अमोल राजपूत वगळता इतर ५ आरोपींना ९ जुलै रोजी अटक केली होती.
तपासादरम्यान आरोपींनी दिलीप इंगळे याला कर्जत तालुक्यात नेल्याचे कबूल केले. त्यामुळे जानेफळ पोलिसांनी तिथल्या पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी २४ जूनला एक अनोळखी डेड बॉडी सापडल्याचे सांगितले. त्यांनी काढून ठेवलेले फोटो पोलिसांना पाठवण्यात आले. शिवाय १२ जुलै रोजी दिलीपच्या नातेवाईकांनी देखील कर्जत गाठले. मृतदेहाचे फोटो, पंचनाम्याचे कागदपत्र यावरून तो मृतदेह दिलीप इंगळे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
इकडे जानेफळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.पैशाच्या वादातून त्यांनी दिलीप इंगळे याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली, त्यातच दिलीपचा मृत्यू झाला. या प्रकरणात फलटण ,सातारा भागातील आणखी ५ जणांचा समावेश असल्याचे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले. अखेर आता अपहरणाच्या गुन्ह्यात १२ जुलै रोजी खुनाचे कलम समाविष्ट करण्यात आले.
जुन्या कायद्यानुसार दाखल केला गुन्हा...
१ जुलै पासून संपूर्ण भारतात जुन्या ब्रिटिशकालीन कायद्या ऐवजी भारतीय न्याय संहिता लागू झाली. मात्र या प्रकरणात पोलिसांनी जुनेच खुनाचे ३०२ कलम समाविष्ट केले.दिलीप इंगळे याचा खून २२ जून रोजी झाला त्यामुळे या प्रकरणात जुन्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. तपास प्रक्रिया मात्र नव्या भारतीय न्याय संहितेनुसार करण्यात येत असल्याचे जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजितनाथ मोरे यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.