रेती खाणारा डिग्रसचा वाघोबा अडकला पिंजऱ्यात! जिल्हाधिकारी किरण पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येतील अट्टल रेती तस्कराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. तब्बल वर्षभर त्याला अकोला कारागृहात ठेवण्यात येणार आहे. रेतीमाफी विरोधात विदर्भातील ही पहिलीच मोठी कडक कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. रेतीमाफियांना अभय देण्यात येत असल्याचा आरोप महसूल प्रशासनावर होत होता, त्यामुळे प्रशासनाकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले. मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ (३५ वर्ष, रा. डिग्रस ता. देउळगांवराजा) असे कारवाई करण्यात आलेल्या रेती तस्कराचे नाव असून त्याला अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 
  यापूर्वी मनोज वाघ याच्याविरोधात अवैध वाळु चोरी करुन वाहतुक करणे, शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ला करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे व इतर असे बरेच गुन्हे दाखल आहेत. एवढेच नव्हे तर त्याचेवर विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. मात्र त्यांचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा कायदयास काही जुमानत नसल्याने त्यांचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात आली. त्याच्या गुन्हेगारी कृत्याला आळा बसावा म्हणून पोलीस विभागाने कठोर पाऊल उचलले. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी त्यांस स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याला एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याचा आदेश १ जुलै रोजी पारीत केला. विदर्भातील वाळू तस्करांवर केलेली ही प्रथम कठोर कार्यवाही आहे. दरम्यान जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांचे आदेशावरून मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ याचा तात्काळ शोध घेवुन आदेशाचे पालन करून आज २ जुलै २०२४ रोजी जिल्हा कारागृह अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक संजय भुजबळ, अंढेरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील, जमादार गोरखनाथ राठोड यांनी ही कारवाई केली.