शेगावमध्ये भाविकाला ऑटोवाल्याने लुटले!

 
file photo

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला ऑटोचालक व त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना काल, २१ नोव्हेंबरच्या रात्री ११ च्या सुमारास घडली. आज, २२ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी दोघा लुटारूंना अटक केली आहे. शेख शाहरुख शेख करीम (२४, रा. काँग्रेसनगर, शेगाव) व बबलू ऊर्फ तुर्रम खान मिया खान (३१, रा. आझादनगर, शेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळणीपूर्णा (ता. चांदुरबाजार, जि. अमरावती) येथील शुभम वामनराव इंगळे (२८) हा काल, २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता विदर्भ एक्‍स्‍प्रेसने श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात पोहोचला होता. गजानन महाराज मंदिरासमोरील चौकातील एका ऑटोचालकाने तुम्हाला कमी पैशात भाड्याने रूम करून देतो व एका ठिकाणी ३५ रुपयांत पोटभर जेवण मिळते. तुम्हाला तिथे सोडतो, असे सांगून ऑटोत बसवले.

तिथून काही अंतरावर गेल्यानंतर ऑटोचालकाचा दुसरा साथीदार सुद्धा ऑटोत येऊन बसला. दोघांनी मिळून शुभमला अंधारात नेऊन बेदम मारहाण केली व त्याच्या खिशातून १२ हजार १०० रुपये घेऊन दोघेही ऑटो घेऊन पसार झाले. या प्रकारानंतर घाबरलेल्या शुभमने शेगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे आपबिती कथन केली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून आणले असता या दोघांनीच लुटमार केल्याचे शुभमने पोलिसांना सांगितले. शुभमच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.