अमडापूरच्या पोलीस स्टेशनात तक्रार देवूनही हराळखेडच्या जाधव परिवाराला न्याय मिळेना; आता जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा ! प्रकरण काय बातमीत वाचा..
समाधान मोतीराम जाधव यांची हराळखेड शिवारात गट क्र. २२१ मध्ये ६२ आर शेती आहे. या शेतीला लागूनच अशोक मारोती जाधव यांची गट क्र. २२२ मध्ये शेती आहे. १६ नोव्हेंबर २०१८ साली समाधान जाधव यांनी त्यांची शेती विकत घेतली होती. शेती लागूनच असल्याने समाधान यांची अशोक यांच्यासोबत नेहमी कुणकुण लागायची. शेतीच्या धुऱ्यावरून नेहमी वाद निर्माण होत होता. दरम्यान, ९ मे २०२४ समाधान जाधव यांनी अशोक यांना त्यांच्या शेतात मशागत करण्यापासून रोखले. त्यावेळी त्यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती.
याप्रकरणी त्यांनी चिखली येथील न्यायालयात देखील धाव घेतली. अशोक जाधव व त्याचे नातेवाईक समाधान जाधव यांच्या ताब्यातील जमिनीमध्ये अडथळा निर्माण करू नये अशी ताकीद सुद्धा दिली होती. असे असताना, अशोक जाधव हा शेतीच्या धुऱ्याना कोरत कोरत नेहमी शिवीगाळ करत होता, जीवाने मारण्याची धमकीही अशोक जाधव देत असे. त्यानंतर अशोक जाधव, त्याचा मुलगा गोपाल जाधव, जगदीश जाधव हे लाट्या काट्या घेऊन कुराड हातात घेऊन शेतात उभे राहतात आणि समाधान जाधव यांना शेतात जाण्यापासून रोखतात. एवढेच काय तर अशोक जाधव याने शेतात पेरणी देखील केली आहे. हे तिघे मिळून काहीही करू शकतात. समाधान जाधव यांना शेती करणे अतिशय कठीण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अमडापूर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने समाधान जाधव यांनी २४ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला. समाधान जाधव यांचा परिवार याच तणावात आहे, अशोक जाधव, गोपाल, जगदीश यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.