महिला पोलिसाला उडवणाऱ्या क्रूझरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; बुलडाण्यातील घटना

 
अपघात
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ड्युटीवरून घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलेला मागून येणाऱ्या भरधाव क्रूझरने उडवले होते. यात त्‍या जखमी झाल्या होत्या. या अपघात प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी क्रूझरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात ५ जानेवारीला सायंकाळी घडला होता. मात्र उपचार घेत असल्याने उशिरा तक्रार देण्यात आली आहे.
अनिता ज्ञानबा गाडे (४०, रा. सुंदरखेड बुलडाणा) असे जखमी पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे. रामेश्वर सुभाषराव सपकाळ (३६, रा. तुळसीनगर, बुलडाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना बुलडाणा शहरात चिखली- बुलडाणा रोडवरील आेंकार फर्निचरच्या गेटजवळ घडली होती. ड्युटीवरून स्कुटीने घरी परतताना भरधाव क्रूझरने (MH28 V1374) त्‍यांना उडवले होते. त्‍या दुभाजकावर जोराने आदळल्या होत्या. यात त्‍या जखमी होऊन बेशुद्ध पडल्या होत्या. पोलिसांनीच त्‍यांना खासगी रुग्णालयात भरती केले होते. ७ जानेवारीला त्‍या बऱ्या झाल्या. त्‍यानंतर त्‍यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.