चिखलीत शिंदे गटाच्या ५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल! ॲड. शर्वरी तुपकरांची तक्रार; समाज माध्यमांवर घाणेरडी भाषा वापरल्याचा आरोप!

 
police sation chikhali

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या ५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन मोरे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड व शहर अध्यक्ष विलास घोलप यांच्याविरुद्ध १९ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी त्यासंबंधीची तक्रार दिली. आपल्याविरुद्ध समाजमाध्यमावर अपमानकारक भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केलाय.

gode

                             ( जाहिरात )

 या तक्रारीत नमुद आहे चिखली येथील व्यापारी गाडे यांच्या वतीने दिवानी न्यायालय बुलडाणा येथे प्रकरण दाखल केल्याचे निमित्त करुन शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप यांनी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली होती. यात समाज माध्यमांवर बोलताना अश्लील भाषेत टिकाटिप्पणी केली तसेच अपमानजनक वक्तव्य केले. त्यानंतर व्हॉटस् ॲप, फेसबूक आदी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करुन चुकीचे आरोप केले . अश्लाघ्य व बदनामीकरक शब्दांनी त्यांनी अपमानीत करण्यासह सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कृत्य त्यांनी केले असा आरोप ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिलेल्या या तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून  चिखली पोलिसांनी गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड,विलास घोलप यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०१, ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

कोणत्याही महिलेचा अवमान खपवून घेणार नाही -ॲड. शर्वरी तुपकर

माझ्यावर आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात देखील आई, पत्नी, मुली अशा महिला आहेत, त्यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर अपशब्द वापरल्यास त्यांना काय वाटेल? माझाच काय, कोणत्याही महिलेचा अश्लील आणि अपशब्द वापरुन अपमान करणे, समाजमाध्यमांवर अपमानजनक पोस्ट व्हायरल करणे संयुक्तीक नाही. महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, राजकारण करतांना कोणत्याही महिलेविषयी लज्जास्पद वक्तव्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे, महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांनी कायदेशीर कारवाईचा विचार करुनच बोलावे, यापुढे पुन्हा कुणी अशी घाणेरडी भाषा वापरल्यास त्याची गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिली आहे.