चुलत बहीण- भावाचा तलावात बुडून मृत्यू

चिखली तालुक्यातील घटना
 
 
खामगावनंतर आता लोणारमध्येही तशीच घटना… बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्‍यू
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सख्ख्या चुलत बहीण- भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सवणा (ता. चिखली) येथे घडली.

अंजली नामदेव गवारे (८) आणि कृष्णा दामोधर गवारे (६ दोघेही रा. सवणा) अशी मृत्यू झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. चिमुकले बहीण-भाऊ काल आईसोबत मेंढ्या चारण्यासाठी  शेतात गेले होते. अंजलीची आई मेंढ्या हाकण्यासाठी गेली असताना शिवारातील एका कट्ट्यावर पोहण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. आईने मुलांना आवाज दिला असता मुलांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आईने तलावावर जाऊन बघितले असता तलावाच्या काठावर कपडे दिसून आले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील मंगेश करवंदे यांनी माहिती चिखली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने बहीण- भावाचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आज सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.