सुनेने पैसे देण्यास नकार दिला म्हणून चुलत सासऱ्याने केले कांड! बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा...

 
Gv. Fc
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सुनेने पाचशे रुपये देण्यास नकार दिला म्हणून चुलत सासऱ्याने शिवीगाळ केली तसेच विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना देखील मारहाण केल्याची घटना मोताळा तालुक्यातील पलढग येथून समोर आली आहे. याप्रकरणी सून सीमा जाधव यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 घटना रविवारी, ३० एप्रिलला घडली होती. सीमा जाधव यांचे पती महेंद्र व सासू लताबाई कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. त्यावेळी घराजवळच राहणारे चुलत सासरे उत्तम तोतराव जाधव हे घरी आले व त्यांनी ५०० रुपये उसने मागितले. त्यांनतर "माझ्याजवळ पैसे नाही मी तुम्हाला पाचशे रुपये देऊ शकत नाही" असे म्हणत सीमा जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिला होता.
त्यामुळे संतप्त झालेला चुलत सासरा उत्तम जाधव यानी शिवीगाळ केली. थोड्यावेळाने पती महेंद्र जाधव आणि सासू लताबाई घरी आल्यानंतर सीमा जाधव यांनी सगळी हकीकत सांगितली. त्यांनतर तिघे जण उत्तम जाधव यांच्या घरी गेले व शिवीगाळ का केली असे विचारले होते. परंतु उत्तम जाधव यांनी तिघांना शिवीगाळ करणे सुरू केले. घरातील लाकडी काठीने पती महेंद्र जाधव व सासू लताबाई यांच्या डोक्यावर वार केले व त्यांना जखमी केले. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी सीमा जाधव ह्या गेल्या असता त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. यावेळी उत्तम जाधव यांची मुलगी आम्रपाली जाधव हिने सुद्धा चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी उत्तम जाधव, आम्रपाली जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.