लाचखोर ग्रामसेवक अभिषेक हिवाळे ACB च्या जाळ्यात!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी ग्रामसेवकाने ग्रामपंचायत सदस्याला ६० हजार रुपयांची लाच मागितली. ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर ६० हजार रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पडताळणी कारवाईत पंचासमक्ष ग्रामपंचायत सदस्याला पैसे काढल्याचे ग्रामसेवकाने सांगितले अन् जाळ्यात अडकला. अभिषेक आदिनाथ हिवाळे (३६, ह. मु. वृंदावननगर, माळविहीर, बुलडाणा, मूळ रा. साखळी, ता. बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तो खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गारडगाव येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे.
गारडगाव येथील ग्रामपंचायत सदस्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. ग्रामपंचायत सदस्याच्या वॉर्डात १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाचे २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे बिल काढण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक हिवाळे हा ६० हजार रुपयांची लाच मागत होता. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत हिवाळेने एसीबीच्या पंचासमक्ष ६० हजार रुपयांची लाच मागितली. ८२ हजार रुपये बिलाचा हफ्ता काढताना त्यातून २० हजार रुपये काढले व ६२ हजार रुपये मजुरांच्या खात्यात टाकल्याचेही हिवाळेने सांगितले. उर्वरित बिलातून ४० हजार रुपये काढणार असल्याचे हिवाळेने सांगितले.
१८ नोव्हेंबर रोजी हिवाळेने उर्वरित बिल काढून ४० हजार रुपये रक्कम अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. आज, २५ नोव्हेंबर रोजी एसीबीने पुन्हा पडताळणी कारवाई केली. पडताळणी कारवाई दरम्यान हिवाळे याने पहिल्या हफ्त्यातून २० व दुसऱ्या हफ्त्यातून ४० हजार रुपये काढल्याचे एसीबीच्या पंचासमक्ष ग्रामपंचायत सदस्याला सांगितले. हिवाळेने लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने त्याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पुढील कारवाई सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्याम भांगे, पो.ना. प्रविण बैरागी, राजू क्षीरसागर, सुनील राऊत, पोकाँ विनोद लोखंडे, जगदीश पवार,चालक पोकाँ अर्शद शेख यांनी केली.