पोलिसांवर संक्रांत! खामगावमध्ये महिला कर्मचाऱ्याला मारहाण, अमडापूरमध्ये कॉन्‍स्‍टेबलला अश्लील शिविगाळ!

 
police
खामगाव/अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम कर्तव्यदक्ष राहणाऱ्या पोलिसांना काही विचित्र लोकांकडून अत्‍यंत वाईट आणि संतापजनक वागणूक मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. खामगावमध्ये शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिविगाळ करत अंगावर धावून येत खाली पाडले. जीवे मारण्याची धमकी देत त्‍यांना मोबाइल फेकून मारला, तर अमडापूरमध्ये एका पोलीस कॉन्‍स्‍टेबलला मोबाइलवरून अश्लील शिविगाळ करण्यात आली. एवढेच नाही तर संपूर्ण पोलिसांचाच उद्धार केला. या दोन्‍ही घटनांमुळे सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्‍त केला असून, दोन्‍ही घटनांतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी. जेणेकरून कुणी अशाप्रकारे कायद्याच्या रक्षकांचे मनोबल खच्‍ची करण्याचा प्रयत्‍न करणार नाही, अशी मागणी केली जात आहे.

झाले असे, की एका गुन्ह्यातील काही आरोपींना खामगाव शहर पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींना भांडण्यासाठी बाळापूर फैल भागातील ज्योती मोरे नावाची महिला काल, २९ डिसेंबरला रात्री १० वाजता पोलीस ठाण्यात आली. ती आल्या आल्या आरडाओरड व शिविगाळ करू लागली. त्यावेळी महिला पोलीस कर्मचारी सुनीता रामकिशन कश्यप (३८) यांनी इथे आरडाओरड करू नको, असे सांगितले. त्‍यावर ज्‍योती त्‍यांच्या अंगावर धावून गेली. त्‍यांना अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व मोबाइल फेकून मारला. सुनीता कश्यप यांच्या तक्रारीवरून ज्योती मोरेविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत पोकाँ पंढरीनाथ आनंदा मिसाळ यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते चिखली पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. काल सकाळी १० ते रात्री दहा पर्यंत त्‍यांची डायल ११२ वर ड्युटी होती. दुपारी तीनला चिखली पोलीस ठाण्यात हजर असताना त्‍यांना ९०७५१२३८९४ या मोबाइलवरून फोन आला. मिसाळ यांनी अडचण विचारण्यासाठी परत फोन केला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्‍तीने अश्लील शिविगाळ सुरू केली.

मै तुम्‍हारी कमिशनर को कम्प्लेंट करता हूँ, पोलीस XX, पोलीसवाला XXX असे काहीबाही बोलून त्‍याने गळ ओकायला सुरुवात केली. मिसाळ यांनी तातडीने या कॉलवरील शिविगाळीची माहिती पोलीस निरिक्षक श्री. लांडे यांना दिली. याच मोबाइलधारकाने यापूर्वीही अनेकदा कॉल करून नापोकाँ विजय किटे, नापोकाँ श्री. गाडेकर यांनाही अश्लील शिविगाळ केली आहे. माेबाइलधारकाला पोलीस अक्षरशः वैतागले आहेत. अखेर काल अमडापूर पोलीस ठाण्यात या मोबाइलधारकाविरुद्ध श्री. मिसाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोबाइलधारकाविरुद्ध कडक कारवाई होणे गरजेचे आहे. जर तो पोलिसांनाच घाबरत नसेल तर सामान्य लोकांसाठी किती भयंकर ठरू शकतो, अशी चिंता व्यक्‍त केली जात आहे.