बालविवाह उरकणार होते...आई देऊळघाटला येऊन धडकली!

मग पोलिसांनीच रोखले १४ वर्षांच्या मुलीचे लग्न!!
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट येथे आज, २५ नोव्हेंबरला अवघ्या १४ वर्षीय मुलीचा विवाह होणार होता. पण जिल्हा बालकल्याण कक्षाला या विवाहाची कुणकुण लागताच विवाह थांबविण्यात आला. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत लग्न लावणार नाहीत, अशी लेखी हमी पालकांकडून घेण्यात आली. मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत देऊळगाव राजा तालुक्यातील तरुणाशी मुलीचे लग्न लागणार होते.

२००७ मध्ये जन्मलेल्या देऊळघाट येथील १४ वर्षीय मुलीला देऊळगाव राजा येथील तरुण पाहून गेला होता. आई मुंबईला मावशीकडे तर वडील कामानिमित्त दुसऱ्या गावी असल्याने ती देऊळघाट येथे चुलत्यांकडे राहत होती. त्यामुळे मुलीच्या काकांनी व आत्याने लग्नसंबंधाची बोलणी केली होती. मुलीने याबाबत तिच्या मावशीला फोनवरून माहिती दिली होती. मुलगी लहान असल्याने तिची आई आणि मावशीचा लग्नाला विरोध होता. लग्न रोखण्यासाठी मावशी आणि आई आज सकाळीच देऊळघाट येथे दाखल झाल्या होत्या. दरम्यान या प्रकाराची चाहुल जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दिवेश मराठे, समुपदेशक श्रीमती शारदा पवार यांना लागली. याप्रकरणाची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.

पोलीस पथक आणि बालसंरक्षण कक्ष समुपदेशक देऊळघाट येथे दाखल झाले. मुलगी, तिची आई, मावशी व इतर नातेवाइकांना बालसंरक्षण समितीसमोर हजर करण्यात आले. सर्वांचे लेखी जबाब घेण्यात आले. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत लग्न करणार नाही, असे पालकांकडून लेखी घेण्यात आले. ही कारवाई बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहायक पोलीस निरिक्षक सदानंद सोनकांबळे, जिल्हा बालसंरक्षण कक्ष समुपदेशक श्रीमती शारदा पवार, देऊळघाटचे सरपंच रुपचंद पसरटे, ग्रामसेवक पी. एस. देशमुख, अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार, खुशालराव जाधव व ग्रामपंचायत सदस्य व बालसंरक्षण समिती सदस्यांनी केली.