चिखलीच्या उद्योजकाला पावणेदोन लाखांनी गंडवले!

सोशल मीडियावरील जाहिरातीला रिस्पॉन्स दिल्याचा परिणाम
 
online frod

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केवळ सोशल मीडियावरील जाहिरातीवरून व्यवसायासाठी आर्थिक व्यवहार करणे किती महागात पडू शकते याचा अनुभव चिखलीच्या उद्योजकाला आला आहे. उद्योजकाने सोशल मीडियावर झेरॉक्सचे पेपर पुरवणाऱ्या कंपनीची जाहिरात पाहिली. त्यावर असलेल्या फोन नंबरवर चौकशी करून हव्या असलेल्या मालाची किंमत ठरवली. ॲडव्हान्स म्हणून कंपनीला १ लाख ८२ हजार रुपये पाठविले. मात्र नियोजित वेळेत कंपनीने माल चिखलीला पाठविलाच नाही. नंतर कंपनीचा नंबर असल्याचा दावा करणारी समोरील व्यक्ती उडवाउडवीची व आणखी पैसे लागतील, असे सांगू लागली. संशय आल्याने त्या उद्योजकाने जाहिरातीत असलेल्या कंपनीच्या पत्त्यावर जायचे ठरवले व आसाम गाठले. त्या पत्त्यावर कोणतीही कंपनी नसल्याचे समोर आले. अखेर चिखली पोलीस ठाण्यात काल, ११ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मूळचे चिखली तालुक्यातील आमखेड येथील रहिवासी व सध्या चिखलीच्या गांधीनगरात राहणारे राजू केशवराव भाकडे यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. त्यांचा चिखली एमआयडीसीत बॅग प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. त्यांना या व्यवसायासोबत पेपरचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे इंडिया मार्ट या वेबसाईटवर त्यांना कोणती कंपनी झेरॉक्स पेपरचा पुरवठा करू शकते याबाबत सर्च केले. तेव्हा सिटी एंटरप्राईजेस भांगागड, कामरूप, गुवाहाटी आसाम या कंपनीची माहिती मिळाली. कंपनी कमी दरात झेरॉक्स पेपरचा पुरवठा करेल असे सांगण्यात आले. भाकडे यांना पेपरचे ८०० बॉक्स हवे होते. त्याचा दर ५ लाख २० हजार रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ५० टक्के रक्कम ॲडव्हान्स व ५० टक्के रक्कम माल पोहोचल्यानंतर द्यावी, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

मात्र भाकडे यांनी ३५ टक्के रक्कम भरण्याची तयारी दर्शवली व ३ डिसेंबर २०२१ रोजी १ लाख ८२ हजार २००  रुपये कंपनीच्या खात्यात टाकले. ८ डिसेंबरपर्यंत माल पोहाचेल असे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांना माल मिळाला नाही. ज्या नंबरवर आधीपासून बोलणे सुरू होते त्याला फोन केला असता तुमचा माल स्मार्ट ग्लोबल लॉजीस्टिकला पाठवला आहे, असे म्हणून स्मार्ट ग्लोबल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट एजन्सीसोबत बोलणे करून घ्या असे सांगितले व एक मोबाइल नंबर पाठवला.

भाकडे यांनी त्या मोबाइल नंबरवर फोन केला असता तुमचा माल आमच्याकडे आहे. मात्र या मालाचा २ लाख १० हजार २००  रुपयांचा इन्शुरन्स काढावा लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे भाकडे यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा कंपनीला याबाबत विचारणा केली व माल पोहोचवायची जबाबदारी तुमची होती. आता मला तुमचा मला नकोय मला माझे पैसे परत द्या असे सांगितले. मात्र तुम्ही स्मार्ट ग्लोबल लॉजिस्टिकला पैसे पाठवल्याशिवाय तुमचा माल व पैसे परत मिळणार नाही, कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाकडे यांनी थेट आसाम गाठले. सिटी एंटरप्राईजेस भांगागड कामरूप, गुवाहाटी  या पत्त्यावर जाऊन पाहिले असता तिथे आली कोणतीही कंपनी व कंपनीचे कार्यालय दिसले नाही. त्यांना आसाम पोलिसांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगितले. त्यामुळे राजू भाकडे यांनी काल तक्रार दिली. तक्रारीवरून ज्या मोबाइल नंबरवर बोलून भाकडे यांचा आर्थिक व्यवहार झाला होता त्या ९१७०३६१०९१४० या नंबर धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.