चिखली हादरले! आनंद इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाची निर्दयीपणे हत्या!!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, १७ नोव्हेंबरला पहाटे चिखली शहर व्यावसायिकाच्या निर्दयीपणे झालेल्या हत्येमुळे हादरून गेले आहे. काल, १६ नोव्हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकानात शिरलेल्या दोन चोरट्यांनी आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची पोटावर चाकूचे वार करून हत्या केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला असून, एक चोरटा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबलेला होता.
चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात कमलेश पोपट (५५) यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स आहे. काल रात्री दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले. बाजूचे लहान शटर उघडे असताना तिघे जण मोटारसायकलने दुकानासमोर आले. त्यातील एक जण बाहेर थांबला. दोन जण ग्राहक बनून दुकानात शिरले. त्यांनी पोपट यांच्याशी झटापट करत पोटावर चाकूचे वार करून अत्यंत निर्दयीपणे त्यांचा खून केला. त्यानंतर काउंटरमधील रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.
हा संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरोडेखोरांनी तोंडावर स्कार्फ बांधल्याचे दिसते. रस्त्यावरून जाणाऱ्यांना कमलेश पोपट जमिनीवर तडफडताना दिसले. घटनेची माहिती पोपट यांच्या कुटूंबियांना कळविण्यात आली. तातडीने पोपट यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलडाण्यावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान दुकानाभोवतीच घुटमळले. रात्रीच नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या असून, रात्रीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी चिखलीत ठाण मांडून आहेत.
आज चिखली बंद!; वाढत्या घटनांमुळे व्यापारी संतप्त
या घटनेच्या निषेधार्थ चिखली शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी आज, १७ नोव्हेंबरला चिखली बंदचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिखली शहर व तालुक्यात घरफोड्या, दुकानांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काल रात्री सशस्त्र चोरट्यांनी कमलेश पोपट यांच्या आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसून पोपट यांच्यावर चाकूचे वार करून हत्या केली. चोर, दरोडेखोरांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही. त्यामुळे अशा घटना सातत्याने वाढत असल्याचा आरोप चिखली भाजपनेसुद्धा केला असून, व्यापाऱ्यांच्या चिखली शहर बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.