मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली अपघाताच्या घटनास्थळी भेट! देऊळगावराजात जखमींची विचारपूस केली! मुख्यमंत्री म्हणाले, दुःख मोठे....

 
देऊळगावराजा( गणेश धुंदळे,राजेश कोल्हे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर मध्यरात्री दिडला खासगी बस उलटून पेटल्याने २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच या घटनेवर शोक व्यक्त केला होता. मृतांना ५ लाखांची मदत देखील जाहीर केली होती. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सगळे कार्यक्रम रद्द करून अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.
 

sarkar

ठाण्यावरुन मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरला विमानाने आले. तिथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस समृध्दी महामार्गाने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दोघेही देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात पोहचले. तिथे अपघातातून वाचलेल्या जखमींची, नातेवाईकांची विचारपूस केली. "आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. उपचाराची  काळजी करू नका" असे मुख्यमंत्री जखमींशी बोलतांना म्हणाले. "या अपघाताचे दुःख मोठे आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे" असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला.