Amazon Ad

जिल्ह्यात हाहाकार! वादळाने खामगावसह, मलकापूर, नांदुरा, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यात धुमाकूळ!;घरावरील पत्रे उडाली, रस्त्यावरील फलक पडले,चारचाकी गाड्यांचेही नुकसान!

शेगावात वीज पडून बालकाचा मृत्यू...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,२६ मेच्या संध्याकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या वादळात घरांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. मलकापूर, मोताळा तालुक्यात रस्त्यांवर शेकडो झाडे पडली त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.मलकापूर, मोताळा रस्त्यावरील वाहतूक काल सायंकाळी दोन तासांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. दरम्यान शेगावात वीज पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वेदांत सुभाष शेगोकर असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
 खामगाव,मलकापूर, नांदुरा, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन वादळामुळे विस्कळीत झाली आहे. काल सायंकाळपासून या भागातील वीज गायब आहे. खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे तीन चारचाकी, पंचवीस ते तीस दुचाकी यावर चिंचेचे झाड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळा कदमापूर येथील शाळेचे टिन पत्रे उडून गेले आहेत. चार हजार चारशे केव्ही असलेल्या लाईन चे सहा टॉवर जमीनदोस्त झाले आहेत.यासह संभापुर येथील ग्रामपंचायतची कौले जोराच्या वाऱ्याने उडून गेली आहेत. खामगाव - मेहकर रोडवरील टेंभुर्णा फाट्यावरील रोडवर लावलेला फलक वाऱ्याने तुटून पडला आहे. आसलगाव येथील बाजार समितीचे शेड उडून गेले आहे. खामगाव नगरपालिका कर्मचारी यांचे निवासस्थान असलेले टॉवर चौकातील घरावरील टिनपत्रे उडाले आहेत.सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अनेक ठिकाणी विजेचे तार पडल्याने बत्ती गुल झाली आहे.