Amazon Ad

चिखलीच्या नायब तहसीलदारांना चंदनपुरच्या तरुणाची धमकी! कसा रस्ता खुला करता तेच मी पाहतो! म्हणे,खंडाळा चौफुलीवर भेटा,बघून घेतो; पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष मुंडे यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. चिखली तालुक्यातील चंदनपुर येथील एका तरुणाने मुंडे यांना धमकी दिली. तशा आशयाची तक्रार १९ जूनच्या रात्री उशिरा चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्यावरून चंदनपुर येथील योगेश इंगळे या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तरुणाला ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनपुर येथील गट न ७० मधील शेतीचा वादात तहसीलदारांच्या आदेशाने रस्ता खुला करण्याची जबाबदारी नायब तहसीलदार संतोष मुंडे यांच्याकडे होती. आज,२० जून रोजी त्यासाठी नायब तहसीलदार संतोष मुंडे चंदनपुर येथे जाणार होते.दरम्यान काल रात्री ८:१९ मिनिटांनी चंदनपुर येथील योगेश इंगळे या तरुणाचा नायब तहसीलदार मुंडे यांना फोन आला." तुम्ही उद्या चंदनपुरला रस्ता खुला करण्यासाठी येणार आहात तर तुम्ही कसे येता तेच मी पाहतो. व तुम्ही आलेच तर जिवानिशी ठार मारतो" अशी धमकी योगेशने मुंडे यांना दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी तहसीलदार मुंडे यांनी फोन कट केला. त्यानंतर ८ वाजून ३१ मिनिटांनी पुन्हा श्री. मुंडे यांना योगेशचा फोन आला." तुम्ही सध्या चिखलीत राहता तर मी तुम्हाला लगेच खामगाव चौफुलीवर भेटायला येतो, व बघून घेतो" अशी धमकी दिली. त्यामुळे "माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर योगेश इंगळे हा जबाबदार राहील" असे नायब तहसीलदार मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे..
अन् पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला..
दरम्यान या प्रकरणाची माहिती तहसीलदार मुंडे यांनी चिखली पोलिसांना दिली. योगेशने बोलावलेल्या ठिकाणी खामगाव चौफुलीवर तहसीलदार मुंडे पोहचले, यावेळी पोलिसांनी आधीच सापळा रचला होता,त्यामुळे लगेच योगेश इंगळे याला ताब्यात घेण्यात आले.