चंदनपुर हत्याकांड प्रकरण अपडेट! आरोपींना घेऊन पोलीस पुण्यात; बनावट आधारकार्ड प्रकरणाचे धागेदोरे तपासणार...

 
crime

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चंदनपुर येथे १३ ऑक्टोबरच्या रात्री १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पश्चिम बंगालवरून मजुरीच्या बहाण्याने चंदनपुरात आश्रय मिळवणाऱ्या मुलीसोबतच्या दोन तरुणांनीच तिचा खून केल्याचे उघड झाले होते. एलसीबी, बुलडाणा सायबर पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केले होते. मात्र त्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. चंदनपुरात आश्रय मिळवताना आरोपींनी स्वतःची नावे राहुल उर्फ रजत आणि दुसऱ्याचे छोटू सांगितले होते, मात्र आरोपींच्या अटकेनंतर आरोपींची नावे अलीमोद्दीन मिया आणि जाकिर अल दायी अशी असल्याचे समोर आले होते. याशिवाय जाकिर चे आधार कार्ड बनावट असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने तपासाच्या सुचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन पुण्याला गेलेले आहेत.

मयत अल्पवयीन मुलगी १६ वर्षांची असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शिवाय एप्रिल महिन्यात मुलीच्या वडिलांनी कुमारगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आरोपी जाकिर सोबत मुलीची ओळख अगदी अलीकडच्या काही दिवसांतील आहे, एप्रिल महिन्यात तिला एका वेगळ्याच मुलाने पळवले होते. मात्र त्याच्याशी मतभेद झाल्यानंतर ती जाकिर च्या संपर्कात आली. जाकीर चे लग्न झालेले असून त्याला ३ महिन्यांची एक मुलगी देखील आहे.

  मात्र असे असले तरी जाकीर त्या पीडित मुलीला घेऊन आधी पुण्यात व नंतर चंदनपुर येथे आला. पुण्यात काम मिळवण्यासाठी जाकीर ने बनावट आधार कार्ड देखील बनवले. जाकीरचा जवळचा नातेवाईक अलीमोद्दिन मिया हा देखील त्यांच्यासोबत चंदनपुरात आला. एकूण १५ लोक पश्चिम बंगाल मधून काम मिळवण्यासाठी काही दिवसाआधी पुण्यात आले. त्यात पीडित मयत मुलीसह ३ महिला व १२ पुरुष होते असे तपासात समोर येत आहेत.  हा प्रकार मानवी तस्करीशी संबंधित आहे का? असाही  संशय पोलिसांना आहे. शिवाय जाकीर ने बनावट आधार कार्ड का बनवले, त्याचा हेतू काय होता? या प्रकरणात बांगलादेशी घुसखोरीशी संबधित काही हाती लागते का? बनावट आधार कार्ड बनवून कोण देते? आतापर्यंत किती जणांनी बनावट आधार तयार करून त्याचा गैरवापर केला असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपास अधिकारी बदलून पीआय किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास व्हावा अशी मागणी होत आहे.