विनापरवाना लाकडे भरून नेणारा ट्रक पकडला! दोन आरोपी अटकेत : मुख्य आरोपी फरार; मेहकर तालुक्यातील वनसंपदेवर पापींची नजर..

 
crime

मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याला अपार वनसंपदा लाभलेली आहे. मात्र आता ही वनसंपदा भामट्यांच्या डोळ्यात खुपू लागली आहे. लाकडे चोरायची अन् अमाप पैसा कमवायचा हा या भामट्यांच्या धंदाच होऊन बसलाय.एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देते तर दुसरीकडे सर्रास झाडाची कत्तल करून मोठ्या ट्रकने त्याची तस्करी केल्या जात असल्याचे दिसून येते. अश्यातच मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते येथे निम व बाभळीची लाकडे हायड्राद्वारे ट्रकमध्ये भरून नेली जात असल्याची माहिती गुप्त माहितीदाराने वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या गस्ती पथकाने काल ,२ नोव्हेंबरला त्यावर कारवाई केली.

मेहकर पासून जवळच असलेल्या ग्राम कोयाळी सास्ते येथील स्मशानभूमी जवळ एमएच २८ बीके ७१५७ क्रमांकाच्या हायड्राने एमएच १९, झेड १९४२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये निम व बाभूळचा गोल माल २९.०२४ घन मिटर किंमत २ लाख ७८ हजार ३४० रुपये, ट्रक ५ लाख ५० हजार तर हायड्रा ५ लाख असे ऐकूण १३ लाख २८ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  मेहकर येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी वन गुन्हा  नोंदवण्यात आला असून यात आरोपी ट्रक चालक शरीफ शाह सादिक शाह रा. इसरुळ ता. चिखली, शे. अनिस शे. कदीर रा. सुलतानपूर हायड्रा चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून लाकडे चोराचा तपास करून शोध लावणे सुरु आहे. सदर कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ, यांच्या मार्गदर्शनखाली वनपाल ए. पी. श्रीनाथ, वनरक्षक व्ही. के गुसिंगे, पोहेकाँ बी. आर. काकड यांनी केली.