परप्रांतीय नव्‍हे चिखलीच्याच ५ दरोडेखोरांनीच लुटली २० लाखांची रोकड!

केळवदच्या स्‍टेट बँकेवरील दरोड्याचा तपास अवघ्या १४ दिवसांत!
 
File Photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केळवद (ता. चिखली) येथील भारतीय स्टेट बँकेवर दरोडा घालणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. २० लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटली होती. ही घटना ३० ऑक्टोबरला सकाळी समोर आली होती. अत्यंत चतुराईने अवघ्या १४ दिवसांत तपास पूर्ण करण्यात आला. बँक परिसरात सापडलेल्या पुराव्यांवरून आरोपी परराज्यातील असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात अटकेतील पाचही जण चिखली तालुक्यातील रहिवासी आहेत. या टोळीला परराज्यातील टोळीचे सहकार्य मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे.

चंद्रसिंग नरसिंग खर्दे (३०), शिवाजी हरिश्चंद्र देशमुख (२५), प्रदीप देशमुख (३०, तिघेही रा. नायगाव, ता. चिखली), अक्षय अंभोरे (३०), शिवाजी गायकवाड (३०, दोघे रा. लोणी लव्हाळा, ता. चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. केळवद येथील किन्होळा रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या इमारतीत दरोडेखोरांनी मागील बाजूच्या भिंतीतील खिडकीचे गज कापून प्रवेश केला होता. आधी वीजपुरवठा खंडित करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोडणी तोडली व नंतर गॅस कटरने लॉकर तोडून रोख रक्कम घेऊन फरार झाले होते. बँकेच्या मागील बाजूस गॅस सिलिंडर, हॅन्डग्लोज, बॅटरी आणि २४ ऑक्टोबरच्या तारखेचे तेलगू भाषेतील वृत्तपत्र सापडले होते. त्यामुळे दरोडेखोर परप्रांतीय असण्याची शक्यता वर्तवण्यात होती.

कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांना शोधण्यासाठी चार पथके तयार केली होती. यात सायबर विभागाचे स्वतंत्र पथक गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत करण्यात आले होते. घटनेनंतर चिखली पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिखली पोलीस ठाणे, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखा, सायबर सेल वेगवेगळ्या अँगलने तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना काही सुगावे हाती लागले आणि त्यावरून पाच जणांना  १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना काल, १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असा लागला शोध...
घटनेनंतर तपास करत असताना सायबर पोलीस ठाण्याच्‍या पथकाला ३० ऑक्टोबरच्या रात्री ३:४५ वाजता झालेला एकमेव फोन कॉलचा ट्रेस लागला. एवढ्या रात्री कोणाशी कोण काय संभाषण केले असेल याची खातरजमा पोलिसांनी केली असता हे दोन आरोपींमधले संभाषण असल्याचे समोर आले. त्या मोबाइल मालकाचा शोध घेत सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपी अलगद जाळ्यात अडकले. अटक करण्यात आलेल्या टोळीला परराज्यातील टोळीचेसुद्धा सहकार्य असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.