BREAKING निवडणुकीच्या तोंडावर १० लाखांची कॅश पकडली! डिक्कीत ठेवली होती रोकड; येळगाव टोलनाक्यावर मध्यरात्री भरारी पथकाची कारवाई...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली असून तब्बल १० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. येळगाव येथील टोलनाक्यावर मध्यरात्री ही रोकड पकडण्यात आली. तहसीलदारांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बुलडाणा चिखली रस्त्यावरील येळगाव टोलनाक्यावर निवडणूक आयोगाचे भरारी पथक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत आहेत. रात्री पावणेअकराच्या सुमारास चिखलीकडून बुलडाण्याकडे येत असलेल्या एका चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. गाडीच्या डीक्कीत १० लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून सदर रक्कम इन्कम टॅक्स विभागाकडे सोपवण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. ही रक्कम कोणाची? कुणाला देण्यासाठी नेण्यात येत होती? रक्कम कुठून आणली याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.