BREAKING मेहकर फाट्यावर पकडली १० लाख रुपयांची कॅश! गाडीच्या डिक्कीत ठेवली होती रोकड
Updated: Apr 12, 2024, 21:56 IST
चिखली ऋषी भोपळे(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही दिवसांपूर्वी येळगाव टोलनाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने १० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. आता तशीच एक कारवाई चिखली तालुक्यात करण्यात आली आहे. चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले आहे. त्या पथकाने एका ब्रेझा कारमधून १० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. कारमालकाला त्या पैशांचा कोणताही हिशोब व्यवस्थित देता आली नाही, त्यामुळे ती रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात सीलबंद पेटीत ठेवण्यात आली आहे.
आज,१२ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. एम एच ४४, एस ५२१२ क्रमांकाच्या ब्रिझा कारमधून रोकड जप्त करण्यात आली. ही कार पांडुरंग बाजीराव जायभाये (रा. सोनुशी, ता. सिंदखेडराजा) यांच्या मालकीची आहे. कारच्या डिक्कीत एका खाकी रंगाच्या बॅग मध्ये ही रोकड होती. सर्वेक्षण पथकाच्या तपासणी दरम्यान ती आढळून आली, कारमालक जायभाये यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे सदर रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.