धोडप येथील ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल ! मृतदेहाची अवहेलना केल्याचा ठपका; रस्त्यातच केले होते अंत्यसंस्कार...

 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट उभारून अडविल्याने धोडप येथील श्रीराम कोल्हे यांच्या पार्थिवावर १८ मार्च रोजी वहिवाटीच्या रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मृतदेहाची अवहेलना करून हमरस्त्यावर अंत्यविधी केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी नातेवाइकांसह ३५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
Add                             Add.👆
तालुक्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे १८ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमिकडे नेण्यात आली असता गावाच्या वेशीवरच डॉ. गणेश कोल्हे यांनी स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी गेट उभारल्याने अडथळा निर्माण झाला. पार्थिव तेथेच ठेवण्यात आले. यामुळे तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच अमडापूरचे ठाणेदार सचिन पाटील, सहायक फौजदार निवृती चेके, बीट जमादार, पोहेकॉ शिवाजी बिलघे, पोलीस अंमलदार गजानन राजपूत तत्काळ धोडप येथे पोहोचले. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अंत्यविधी न करता स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे आवाहन केले. मात्र, आक्रमक झालेल्या जमावाने रस्त्यावर मनुष्यवस्तीत सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार केले. 
 मृतदेहाची विटंबना करून रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची तक्रार पोहेकॉ शिवाजी बिलघे यांनी दिल्यानंतर अमडापूर पोलिसांनी सोमनाथ एकनाथ कोल्हे, फकिरबा कोल्हे, सोमनाथ सुदाम कोल्हे, रमेश कोल्हे, साहेबराव कोल्हे, कमलाबाई कोल्हे, सुभद्राबाई फकिरबा कोल्हे या नातेवाइकांसह ३० ते ३५ जणांविरुद्ध भादंवि कलम २९७, सहकलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण टेकाळे करीत आहेत.
शांतता राखण्याचे ठाणेदारांचे आवाहन
  ठाणेदार सचिन पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेऊन शांतता प्रस्थापित केली. तसेच ठाणेदार पाटील यांच्यासह चिखलीचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी गावात बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी यावेळी केले. गणेश कोल्हे व मृताच्या नातेवाइकांचा रस्त्याबाबत वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे.