Amazon Ad

बुलढाण्याच्या सोळंके ले आऊट भागात घरफोडी; तीन दिवसांसाठी मूळगावी गेले होते कुटुंब अन् चोरट्यांनी संधी साधली..! तब्बल ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास..

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील सोळंके लेआउट भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल १२ जून रोजी उघडकीस आली.  

प्राप्त माहितीनुसार, सोळंके ले आउट भागातील रहिवासी इंजिनीयर स्वप्निल रघुनाथ म्हळसाने ८ जून रोजी दुपारी आपल्या कुटुंबासह मूळ गावी करतवाडी येथे गेले होते. दरम्यानच, घरी कोणी नसल्याची संधी अज्ञात चोरटयांनी साधली. घराचे कुलूप तोडून ते आत शिरले. पलांगत ठेवलेले २२ हजार नगदी, लोखंडी कपाटातील दागिने असा एकुण ५९ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ११ जूनच्या दुपारी म्हळसाने गावाहून घरी परतले तेव्हा घराचे कुलूप त्यांना तुटलेले दिसून आले. त्यांनतर घरातील इतर साहित्यांची नासधूस झाल्याचे त्यांना दिसले. घरातील रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे तेव्हा उघडकीस आले. काल १२ जून रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.