Amazon Ad

घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल; मिसरूड न फुटलेल्या दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) हार्डवेअर दुकानाचे शटर वाकवून आत शिरत लाखोंचा मुद्देमाल हडपणाऱ्या पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ जून रोजी ताब्यात घेतले. शेगाव तालुक्यातील जलंब येथे २१ मार्चला ही घटना घडली. तीन महिन्यात पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ मोबाईल आणि रोख रक्कम मिळून असा एकुण एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात माटरगावच्या दोघांना अटक करण्यात आली असून तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
   सुपडा सुधाकर खंडारे आणि दीपक महादेव श्रीराथ अशी या प्रकरणातील चोरट्यांची नावे असून दोघेही मिसरूड न फुटलेले १९ वर्षीय तरुण आहेत. शिवाय, तीन विधीसंघर्ष बालकांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले. २१ मार्चच्या रात्री उशिरा माटरगाव येथील व्यावसायिक राजेश सत्यनारायण भुतडा यांच्या हार्डवेअर दुकानामागील शटर वाकवून हे पाच जण आत शिरले. त्यांच्यासोबत इतर काही चोरट्यांचा देखील सहभाग असल्याचे समजते. त्यानंतर दुकानात, विक्रीसाठी ठेवलेले पाच मोबाईल आणि २५ हजार रोख रक्कम त्यांनी चोरून नेली. भुतडा यांच्या तक्रारीवरून, जलंब पोलीस ठाण्यात २२ मार्च रोजी गुन्हा दाखल केल्या गेला. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी जलंब पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले. यानंतर परिसरातील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर पाळत ठेवणे, हात चालाखीवर लक्ष ठेवणे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान, २४ जून रोजी दोन आरोपी व तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना पकडण्यात पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्यामध्ये त्यांचा संबंध असल्याचे सिद्ध झाले. दोघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली असून तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना जलंब पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
    
यांनी केली कारवाई! 
        या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष शोध पथक नेमले आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ही कारवाई करीत आहे. दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात , अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, श्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे, पोना. अनंता फरताळे, चालक पोहेकॉ समाधान टेकाळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली.