बुलडाणा अर्बन बँकेचे धान्य गोडावून फोडले; सव्वा दोन लाख रुपयांची सोयाबीन लांबवली!

लोणार तालुक्‍यातील घटना
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा अर्बन बँकेचे धान्य गोडावून फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांची सोयाबीन चोरून नेली आहे. ही घटना काल, १७ डिसेंबरला सकाळी साडेआठला अंभोरा (ता. लोणार) शिवारात समोर आली.
बुलडाणा अर्बनच्या लोणार शाखेचे लिपिक श्रीहरी लक्ष्मण डहाळके (रा. चोरपांग्रा ता. लोणार) यांनी या प्रकरणात लोणार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्‍यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीतून चोरट्यांनी गोडावूनमध्ये ठेवलेल्या मालापैकी सोयाबीनने भरलेले ५० किलोचे ८२ कट्टे अशी एकूण ४१ क्विंटल सोयाबीन (किंमत २ लाख २५ हजार ५०० रुपये) गायब केले आहेत. बुलडाणा अर्बनच्या लोणार शाखेचे हे गोडावून सौ. अंजली महाजन (रा. लोणार) यांच्या मालकीचे अंभोरा शिवारातील शेतात आहे. गोडावूनमध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीनचा माल भाडेतत्वावर ठेवून त्या मालावर शेतकऱ्यांना बँकडून तारण कर्ज दिले जाते.