बुलडाणा पोलीस शहरातील गुंडगिरी संपविण्याच्या मार्गावर!; अवघ्या २४ तरुणाला लुटणाऱ्यास पकडले!!

 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात गुंडगिरी करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. एकट्या दुकट्याला माणसाला अडवून लुटणे, जीवघेणा हल्ला करण्याचे प्रकार वाढल्याचे पाहून बुलडाणा शहर पोलीसही गंभीर झाले असून, अवघ्या २४ तासांत मोताळ्याच्या तरुणाला लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

बुलडाणा शहरातील राणीबगीच्यात फिरण्यासाठी गेलेल्या मोताळ्याच्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना काल, ४ डिसेंबर रोजी दुपारी अडीचला घडली होती. याप्रकरणी ४ अनोळखी तरुणाविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज, ५ जानेवारीला बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना बेड्या ठोकल्या असून, एक जण फरारी आहे. तिघेही बुलडाण्याच्या मिलिंदनगरातील रहिवासी आहेत. सौरभ संजय खरात (२४), राहुल प्रकाश चौथमल (१९) आणि आकाश पंजाबराव जाधव (२९) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत.

तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोताळा तालुक्यातील निमखेड येथील अक्षय कैलास पवार या तरुणाला राणीबगीच्यात चौघांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून त्याच्या बॅगेतील २ हजार रुपये लांबवले होते.  बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अक्षयने तक्रार दिली होती.