बुलडाणा नगरपालिकेचा गरिबांच्या पोटावर पाय ! पण ,अवैध धंद्यांवाल्यांचे अतिक्रमण काढायची कुणातच हिम्मत नाय! एसपींच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर चालतात अवैध धंदे..! डोळ्यादेखत सार चालतच कसं?

 
ghj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो..बातमीच हेडिंग तुम्ही जे वाचलय ते खर आहे..! शहर सौंदर्यकरणाच्या नावाखाली बुलडाणा नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येते..तशी ती आज,२१ जूनला देखील राबविण्यात आली. पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या बाजूला लोटगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांच्या गाड्या नगरपालिकेने जेसीबीने उचलल्या, अतिक्रमण हटाव होत असताना कुणी विरोध करतो का हे पाहण्यासाठी थेट कॅमेरा लावून हे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाला गरिबांचच कसं दिसत? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. एसपी ऑफिसला लागून असलेल्या मागच्या गल्लीत अवैध धंद्याची दुकाने बिनधास्त सुरू आहेत..विशेष म्हणजे ही दुकाने काही अडगळीच्या ठिकाणी नाहीत. थेट रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून थाटण्यात आलेली आहेत. मात्र असे असले तरी ते हटवायची ना नगरपालिकेची हिम्मत होते ना पोलीस प्रशासनाची...!
 

नगर पालिका आणि एकूणच प्रशासनाची ही भूमिका मात्र सामान्य जनतेला अजिबात रचणारी नाही. तहसील कार्यालय ते स्टेट बँक चौक या परिसरातील दुकाने आज नगरपालिकेने हटवली, त्यातील काही दुकाने चहाची तर काही नाश्त्याची होती. या कारवाईचे व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आले. मात्र नगरपालिका प्रशासनाचा कॅमेरा "त्या" गल्लीत का फिरत नाही?  जनतेच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वी त्या गल्लीतील काही दुकाने  हटवली देखील मात्र ती पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याचे आज बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत दिसून आले. जिल्हा न्यायालयाकडून जयस्तंभ चौकात जातांना १०० मीटर अंतरावर पहिले दुकान लागले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसायला बाकडे, खुर्च्या आणि चहूबाजूने लावलेली हिरवी नेटची जाळी अशा स्वरूपाची ही दुकाने आहेत. या दुकानात वरली मटका, चक्री असे धंदे चालत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जयस्तंभ चौकातून देखील शंभर मीटर अंतरावर २ दुकाने थाटात असल्याचे दिसून आले.

 दुर्लक्ष का?

सर्वसाधारणपणे अवैध धंद्यांवाले अडगळीच्या ठिकाणी किंवा चोरून लपून आपले धंदे चालवत असतात. मात्र बुलडाण्यातील चित्र वेगळे आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर उघडपणे हे धंदे चालतात. या धंद्यावाल्यांना अभय कुणाचे? पोलिसही कारवाया करून दमलेत का?  "आपली माणस आहेत कारवाया करू नका" असा आदेश किंवा विनंती तर कुणी केली नसेल ना असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत गरिबांच्या पोटावर पाय पण अवैध धंदेवाल्यांचे अतिक्रमण काढायची हिम्मत नाय असेच चित्र बुलडाण्यात हाय..!