BULDANA LIVE EXCLUSIVE राजुर घाट प्रकरण; दुसऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा का दाखल केला?
राजकीय दबाव की गुन्हा दाखल करण्याची घाई;चर्चा तर होणारच ना..! कायदेतज्ञांनी ठेवले पोलिसांच्या चुकीवर बोट..
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पीडित व्यक्तीच्या तक्रारीशिवाय किंवा जबाबाशिवाय शक्यतोवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही. पीडिता अल्पवयीन असेल तर तिच्या पालकांची तक्रार ग्राह्य धरण्यात येते, मात्र तशा प्रकरणात देखील तिचा जबाब महत्वाचा असतो. मात्र राजूर घाट प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची (की करवून घेण्याची?) जरा जास्तच घाई झाल्याचे आता दिसून येत आहे.
१३ जुलैच्या या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. अर्थात ८ जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्यावर जनप्रक्षोभ स्वाभाविक आहे, सोशल मीडियावर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र काल दुपारी पोलिसांना दिलेल्या जबाबात आपल्यावर लैंगिक अत्याचार झालाच नसल्याचे विवाहितेने सांगितले. ८ जणांच्या टोळक्याने मोबाईल आणि पैसे हिसकावून मारहाण करून पळ काढल्याची बाब विवाहितेने मान्य केली. मात्र तिच्या नातेवाईक मित्राने बलात्कार झाल्याची जी बाब तक्रारीत नुमुद केली त्याबद्दल मात्र तिने स्पष्ट इन्कार केला आहे.
महिला पोलिस ठाण्यात गेलीच नाही तर...
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कथित घटनेनंतर त्या दिवशी विवाहित महिला बोराखेडी पोलीस ठाण्यात गेलीच नाही. महिला सरळ तिच्या गावाला निघून गेली. मात्र तिचा साथीदार पुरुष त्या टोळक्यामागे मोहेगावात गेला, तिथे ८ जणांपैकी एकाचे नाव त्याला माहीत झाले. त्यानंतर त्याने बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. विवाहित महिला पोलिस ठाण्यात आली नसतांना, तिच्याशी पोलिसांचा कोणताही संपर्क झाला नसतांना किंवा तिने स्वतःहून आपल्यावर बलात्कार झाल्याचे कळवले नसतांना केवळ तिच्या साथीदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल केला. त्याचदिवशी ही बातमी महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली. सगळ्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. बलात्काराच्या प्रकरणात पिडीतेची ओळख जाहीर करायची नसते हा नियम सगळ्याच माध्यमांनी पाळला, मात्र काही गोष्टी कितीही झाकल्या तरी त्या तेवढ्या झाकल्या जात नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे दिवसभर " सामूहिक बलात्कार पीडित" महिला म्हणून सदर महिलेकडे पाहिल्या गेले. यातून तिला काय यातना झाल्या असतील हे शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळे तिच्यावर बलात्कार झालाच नसतांना तो झाला म्हणणारे सारेच यात दोषी आहेत. यदाकदाचित पीडित महिलेने यावर आक्षेप घेतला तर मात्र तक्रार देणारा तसेच गुन्हा दाखल करणारे पोलीसही कायद्याच्या कचाट्यात अडकतील असे कायदेतज्ञांचे मत आहे.
कायद्याची बाजू...
यासंदर्भात "बुलडाणा लाइव्ह" ने उच्च न्यायालयाचे वकील ऍड.विजय बाजड यांची प्रतिक्रिया घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. महीलेसोबत असलेल्या पुरुषाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करायला कायद्याची अडचण नाही. त्यानंतर तपासादरम्यान पिडीतेच्या बयाणावरून गुन्ह्यात बलात्काराचे कलम समाविष्ट करता आले असते. मात्र तसे करण्याऐवजी परपुरुषाच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करणे चूकच असे ऍड विजय बाजड म्हणाले.पोलीस म्हणतात...सदर प्रकरणात महिला ज्या पुरुषासोबत होती त्या पुरुषाने तक्रार दिली आहे. त्याला मारहाण झाली, त्याच्याकडून पैसे हिसकावले आणि महिलेवर अत्याचार झाल्याचे त्याने सांगितले. तक्रारदार हा प्रत्यक्ष त्या घटनेतील असल्याने आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी दिली.