कळ्यांची काळजी होती! फुलांचा मामला होता! नि:शब्द झालं होतं सर्व वातावरण, निषेधही कोणत्या पातळीवर करावा? कळत नव्हतं..!

 
crime

राजेंद्र काळे!

६ वर्षांचं तिचं चिमुकलं वय, आपलं कोण-परकं कोण ? काय कळणार त्या निरागस वयात? बाळापूर तालुक्यातील ‘ती’ कोवळी कळी आई-वडीलांसोबत आली होती लग्नासाठी. रोहडा तपोवन देवी संस्थान परिसरातील मंगल कार्यालयात १२ मे च्या सकाळपासूनच ‘लगीनघाई’ सुरु होती, दुपारचा मुहूर्त. बाजूलाच देवी मंदीर, पुढं दाट झाडांची गार सावली. बाजूला प्रसादाची दुकानं.. अशा ‘कुल’ वातावरणात हे ‘फुल’ बागडत होतं. आईजवळून हट्टाने घेतलेल्या चिल्लरमध्ये पोंगे घेवून खात होतं. मात्र त्याच पोंग्याच्या दुकानातील एक हैवान पोंगा स्वच्छंद बागडणार्‍या या निरागसतेवर डोळा ठेवून होता.

पुरुष मंडळी वरात काढण्याच्या तयारीत, अन् बाया-बापड्या नटून-थटून तयार होत असतांना.. ‘मुलगी काय सकाळपासून बाहेरच खेळतेय’ म्हणून बिनधास्त असतील. सर्वांची तयारी झाल्यावर ‘राधिका कुठंय?’ अशी आईची नजर तिला शोधू लागली. ‘असेल गं कुठंतरी खेळत’ यामुळं दिलासाही आला असेल कदाचित.. पण कुठेच दिसत नाही, हे पाहून आई पुन्हा कावरी-बावरी झालेली. लग्नात विघ्न नको म्हणून, बराचवेळ दमही मारला असेल त्या माय-माऊलीनं. पण शोधून शोधून सैरभैर झाल्यावर त्या माऊलीच्या संयमाचा बांध सुटून तिनं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा. बायांनी तिला मंदीरात नेले, देवीचा धावा सुरु झाला.. दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक त्या माऊलीचा आकांत पाहून असह्य होत होता.

पण आशा जीवंत होत्या.. ‘असेल कुठेतरी राधिका..’ सर्वच शोध घेत होते, हरविल्याची फिर्याद घेवून अंढेरा पोलिस स्टेशन गाठण्यात आले. पोलिस तात्काळ पोहचले. शोध सुरु झाला. सीसीटिव्ही नसल्याने काही कळायलाही मार्ग नव्हता. राधिकाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला, ‘हरवली आहे, सापडल्यास कळवा..’ मेसेज धडकू लागले. खेळता-खेळता विहीरीततर पडली नाही ना? त्या दृष्टीने पहिला शोध सुरु झाला. पाणवडे आणण्यात आले, गळाला काहीच लागेना.. तहानभूक विसरुन पोलिस व काही स्वयंसेवी शोधमोहीमेत व्यस्त होते. दुसरा दिवस उजाडला, आजूबाजूचा परिसर पिंजून काढणे सुरु होते. अखेर १३ मे च्या दुपारी मंदीराच्या पाठीमागील डोंगराळ भागात ‘त्या’ चिमुकलीचा मृतदेह सापडला, अन् एकच खळबळ उडाली. मृतदेहावर दगडाची पाळ रचलेली, रुमालाने गळा आवळून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. खून करण्याआधी तिच्यावर काही अत्याचार झाला का? हे वैद्यकीय चाचणीतच निष्पन्न होणार होते. अनेक शंका-कुशंकांना उधाण आले होते, वेगवेगळ्या बाजूंचा विचार करुन पोलिस यंत्रणा तपासात व्यस्त असतांना..इकडे जनक्षोभ वाढत होता. ‘चिखली बंद’चे आवाहन करण्यात आले.

आरोपींना तात्काळ शोधण्याचा दबाव पोलिसांवर वाढत होता. पार्थीव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले, अखेर जे व्हायचे नव्हते तेच झाल्याचे पोस्टमार्टमच्या प्राथमिक चाचणीत समोर आल्याची बातमी पसरली.. अन् पुन्हा मोठी खळबळ उडाली. तिकडे पोलिस तपास वेगवेगळ्या ‘अँगल’ने सुरुच होता, पहिला संशय नातेवाईकांवरच. परिसरातील गुन्हेगारी व्यक्तींकडून सुगावा घेणे सुरु होते. मंदीर परिसरात वावर असणार्‍यांवर नजर होतीच.. काहीच क्ल्यू मिळत नव्हता, पण हताश न होता पोलिस गुन्हेगाराच्या मागावर होतेच. अशाच चौकशीत सदानंद भगवान रोडगे अशा अध्यात्मीक नावात त्या हैवान तरुणाचा कोवळ्या नखांनी काहीसा ओरबडलेला चेहरा पोलिसांच्या नजरेत आला. सदानंद हा २६ वर्षीय विकृत, गांजा ओढणारा व पॉर्न व्हिडीओ पाहणारा असल्याचे तपासात पुढे आले. दाढीवाल्याकडील चौकशीतर त्याची वस्तार्‍यानेच भादरल्या गेली, तरीही तो कबुल होईना.. सोटे पाठीवर पडताच रचलेल्या पाळेतील गोटेच बाहेर पडावे.. असा तो बोलू लागला. त्यामुळे त्यालाच आरोपी ठरवून अनैसर्गिक कृत्यासह खून व बाललैंगिक अत्याचाराचेही गुन्हे त्यावर दाखल करत त्याला कोठडीत डांबण्यात आले.

मात्र या प्रकरणातून धडा घेणेही गरजेचे आहे. लग्नात किंवा वर्दळीत चिमुकल्यांना पालकांनी एकटे सोडावे का? सतर्कता बाळगणे, हे पालकांचे कर्तव्य आहे.. पालकच निष्काळजीपणा करतीलतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे फावणारंच. वर्दळ असणार्‍या मंदीर व परिसरात, तसेच प्रत्येक मंगल कार्यालयाला सीसीटिव्ही.चे बंधन हवे. फ्रंटसह बॅक साईडही सीसीटिव्ही.च्या कक्षेत यावी. मंदीरात जसे पुजारी असतात, तसे मंदीर परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यावरही संस्थानांकडून विचार व्हावा. घटना घडून गेल्यावर पोलिसांना टार्गेट करुन समाज मोकळा होता, पण पोलिसतरी काय-काय करणार? त्यादिवशी इसरूळला मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्तातही होते, तरीही पोलिस कर्तव्य बजावतच असतात.. इथेतर एका कुचकरल्या गेलेल्या कळीमुळे अनेक ‘कळ्यांची’ काळजी होती.. अन् बहरणार्‍या, फुलांचा मालला होता!

सॅल्यूट..
घटना घडून गेली की, नेहमी पोलिस हेच टार्गेटवर येतात. त्यांच्यावर दबाव वाढतो. तर अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांवर सामाजिक ताशेरे ओढल्या जाणे हेही नित्याचेच.. त्यात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या सुनिल कडासने यांच्यासाठी ही पहिलीच घटना आव्हानात्मक.

सुरुवातीला अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यापुरतेच सिमीत हे ‘मिसींग’ प्रकरण वाटायचे, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व टिमपर्यंत पोहचले. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार ठाणच मांडून बसले. पोलिस अधिक्षकांसह अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी लक्ष ठेवून होते. अनेकविध पातळ्यांवर तपासाची चक्रे फिरली. सर्व करुनही ३ दिवस हाती कोणताच धागा लागत नव्हता, पण हताश होवून अर्थ नव्हता, ‘चिखली बंद’मुळे कैकपट दबाव वाढला होता, माध्यमांनी प्रकरण लावून धरले होते. पण म्हणतात ना, कानून के हात बहुत लंबे होते है.. तसा तपास सुरु होता, कोणाच्या बोलण्यातूनही काही सापडते का? हे सारंकाही सुरु असतांनाच, एका प्रसादालयातील बाईच्या बकर्‍या वळणार्‍या पोराच्या तोंडावर नखांचे व्रण असल्याच्या माहितीतून सदानंदला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बोलण्यातील बदलत्या भूमिकेमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याने मेर्‍यात ज्या सलूनमध्ये दाढी केली होती तिथेच त्याचा गुन्हेगारी चेहरा खर्‍याअर्थाने टराटरा फाडल्या गेला. पोलिस खाक्याने तो बोलू लागला. दोनदा पोंगे घेवून गेलेल्या त्या चिमुकलीजवळ तिसर्‍यांदा पोंगे घेवून जात मंदीरामागून तिला उचलून बाजूच्या निर्जन डोंगरात नेणे, कोणालाच दिसणार नाही.. अशा ठिकाणी तिच्यावर अत्याचार करुन रुमालाने तिचा गळा आवळून तिला कायमची संपवून टाकणे व मृतदेह खाली ठेवून तो कोणाला दिसणार नाही, त्यासाठी त्यावर दगडाची पाळ रचणे.. अशा पध्दतीने पुरावा मागे न ठेवण्याची काळजी घेणारा सदा साधा कसा? त्याच्या साधेपणाच्या आत इतकी भयानक प्रवृत्ती दडलेली असेल, याची कल्पनाही परिसरात वावरणार्‍यांना आली नव्हती, हेही इथे आश्चर्यच !

पोलिसांनी ज्या पध्दतीने येणार्‍या दबावाचा परिणाम न होवू देता शांत डोक्याने तपास केला, व आरोपी शोधला त्याबद्दल बुलढाणा जिल्हा पोलिस दलाला खरंच सॅल्युट!!