दुःखदायक ! दिवसभर शेतात राब राब राबले अन् संध्याकाळी उचलले टोकाचे पाऊल! देऊळगाव घुबेच्या ४० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या..

 
चिखली

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे गावातून धक्कादायक बातमी समोर येते आहे. ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज ४ जुलैच्या सायंकाळी उशिरा ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. 

प्राप्त माहितीनुसार, गणेश भानुदास घुबे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते दिवसभर आपल्या मक्याच्या शेतात राब राब राबले. कोळपणी केली, बैलांना चारापाणी घातला. त्यानंतर गुरेढोरे बांधली. यानंतर, शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही वार्ता गावभर पसरतात परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून गेले. पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. गणेश घुबे यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, वडील व पत्नी, सात वर्षाचा मुलगा आणि दहा वर्षाची मुलगी आहे. प्राप्त माहितीनुसार, घुबे यांच्यावर कर्जाचा बोजा होता. एवढेच नाही तर सततची नापिकी व निसर्गाचा ढासाळलेला समतोलपणा याला वैतागून तसेच लहान मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च, वयोवृद्ध आई-वडील व कुटुंबातील गरजा भागवण्यासाठी गणेश घुबे हे आर्थिक संकटाचा सामना करीत होते. घरातील अडचणी कश्या भागवता येणार या विचाराने ते हतबल झाले होते. अखेर आर्थिक अडचणीला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे, संपूर्ण देऊळगाव घुबेत एकच हळहळ व्यक्त होत आहे. मृतक गणेश घुबे यांच्या परिवाराला शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.