Amazon Ad

BREAKING वेटरला अडकवत घडवले नकली नोटांचे कांड; म्हणाला,५ हजार घे अन् दारू आण! वाईन शॉप वाल्याला संशय आला अन् उघडकीस आली घटना! ३ आरोपी मेहकर पोलीसांच्या ताब्यात! जिल्ह्यात नकली नोटांचे रॅकेट?

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात नकली नोटांचे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे, पोलिसांनाही त्यादृष्टीने प्रयत्न करावा लागणार आहे. काल,२५ जुलैच्या रात्री अग्रवाल वाईन शॉपी येथे एक जण ५ हजार रुपये घेऊन दारू घेण्यासाठी आला. वाईन शॉप मालकाला ५०० रुपयांच्या नोटा पाहून थोडा संशय आला, त्यामुळे त्या नोटा त्यांच्या मालकीच्या अग्रवाल पेट्रोल पंपावरील नोटा मोजण्याच्या मशीन मध्ये चेक केल्या असता नोटा नकली असल्याचे समोर आले. मेकर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दारू खरेदीला आलेल्या आरोपीला त्याब्यात घेतले..त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली, आतापर्यंत मेहकर पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केले आहे. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याचे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारू खरेदीसाठी मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपीवर ५ हजार रुपये घेऊन आलेल्या आरोपीचे नाव सोहम खेत्रे (रा. पिंपरी सरहद, ता.मेहकर) असे आहे. सोहम डोणगाव येथील जगदीश पांडव यांच्या हॉटेल मध्ये कामाला असतो. जगदीश पांडव याने त्याचा मित्र गजानन मुळे रा. डोणगाव याच्याकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. तेच पैसे हॉटेल मालक जगदीश पांडव याने सोहम खेत्रे याच्याकडे देऊन त्याला मेहकर येथून दारू आणायला सांगितली होती. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गजानन मुळे हा असल्याने त्याला पोलिसांनी अटक केले, हॉटेल मालक जगदीश पांडव यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपींची संख्या वाढणार कारण..
दरम्यान या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण हॉटेल मालकाला ५ हजार रुपये उसने देणारा मुख्य आरोपी गजानन मुळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल आहेत. आपण नकली नोटा जगदीश पांडव याला देत असल्याचे त्याला माहीत होते. दरम्यान गजानन मुळे याने हे पैसे कुठून घेतले याचीही माहिती पोलिसांना दिली आहे, त्यामुळे आता चौथा आरोपी देखील गजाआड करण्याच्या दृष्टीने पोलीस पावले उचलत आहेत.